भारतात Audi Q3 Sportback एसयूव्हीचं बुकिंग सुरु, मोजावे लागणार इतके रुपये
ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅकबाबत कारप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या गाडीच्या लाँचिंगपूर्वीच कंपनीने बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. ही गाडी मर्सिडिज जीएलए आणि बीएमडब्ल्यू एक्स1 शी स्पर्धा करेल.
मुंबई- ऑडी ही लक्झरी कार बनवणारी कंपनी आहे. ही गाडी विकत घेणं म्हणजे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं. मात्र गाडीचं किंमत ऐकली तर बघण्यात समाधान मानावं लागतं. असं असलं तरी प्रत्येक स्तरातील कारप्रेमी या महागड्या गाड्यांची माहिती ठेवण्यात उत्सुक असतो. ऑडी कंपनीने भारतात ऑडी क्यू3 स्पोर्टबॅक (Audi Q3 Sportback) लाँच करण्याची घोषणा केली आहे. त्याआधी गाडीचं बुकिंग सुरु करण्यात आलं आहे. 2 लाख रुपये बुकिंगसाठी मोजावे लागणार आहेत. या गाडीचं बुकिंग अधिकृत वेबसाईट, डिलरशिपवर 2 लाख रुपये भरून करता येईल. स्पोर्टी वर्जन असल्याने कारप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे.ही गाडी पुढच्या काही आठवड्यात भारतात लाँच होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. क्यू 3 स्पोर्टबॅक एसयूव्ही ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध आहे. क्यू 3 स्पोर्टबॅकचा सध्या भारतात कोणताही थेट प्रतिस्पर्धी नाही. पण ही गाडी मर्सिडिज जीएलए आणि बीएमडब्ल्यू एक्स1 शी स्पर्धा करेल.
ऑडी Q3 स्पोर्टबॅक अपेक्षित किंमत
क्यू 3 स्पोर्टबॅकची किंमत क्यू 3 एसयूव्हीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या गाडीची किंमत 44.89 लाख ते 50.39 लाख रुपयांदरम्यान(एक्स-शोरूम) भारतात असण्याची शक्यता आहे. कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
ऑडी Q3 स्पोर्टबॅक एक्स्टेरिअर डिझाईन
ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक गाडीला नावाप्रमाणे स्पोर्टी लूक आहे. ही गाडी स्टँडर्ड क्यू 3 पेक्षा थोडी वेगळी आहे.एअर इंटेक डिजाईन असून षटकोनी ग्रिल गाडीला अधिक आकर्षक लूक देतात. या क्यू 3 स्पोर्टबॅकची लांबी 4,518 मिमी, रुंदी 1,843 मिमी आणि उंची 1,558 मिमी आहे. क्यू 3 एसयूव्हीपेक्षा 36 मीमी लांब, 6 मीमी अरुंद आणि 49 मीमी उंच आहे. ऑडी स्पोर्टबॅक टर्बो ब्लू शेडसह पाच पर्यायात उपलब्ध आहे.
ऑडी Q3 स्पोर्टबॅक इंटीरियर डिझाइन
गाडीच्या आतील बाजूस क्यू 3 सारखाच लेआउट आहे. यात 10.1-इंच टचस्क्रीन असून व्हर्च्युअल कॉकपिट ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे. क्यू 3 स्पोर्टबॅकमध्ये 10-स्पीकर ऑडिओ सिस्टम, वायरलेस चार्जर, अॅम्बियंट लाइटिंग, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल दिला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सहा एअरबॅग्ज, चाइल्ड सीट अँकरेज आणि टायर-प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमचा समावेश आहे.