भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे. भारतात सर्व प्रकारच्या कार उपलब्ध आहेत. देशात आता छोट्या कारचा जमाना मागे पडत आहे. मध्यमवर्गाने एसयुव्ही कारवर फोकस दिला आहे. पण यंदा कार कंपन्यांना विक्रीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. कमी विक्रीमुळे कार कंपन्या चिंतेत आहेत. त्यांना उत्पादित कारचा स्टॉक क्लिअर करायचा आहे. कारची संख्या कमी करण्यासाठी कंपन्यांनी जुलै महिन्यात सवलतींचा पाऊस पाडला आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त कार खरेदीची संधी मिळाली आहे.
या कंपन्यांच्या कार विक्रीसाठी उपाय
कारची विक्री घटल्याने कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. स्टॉक वाढत असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. मारुती सुझुकी ब्रिझा, ग्रँड व्हिटारा, होंडा एलिव्हेट या सारख्या लोकप्रिय एसयुव्हीवर बंपर डिस्काऊंट देण्यात येत आहे. तर दुसरीकडे महिंद्रा XUV700 आणि टाटा हॅरियर, सफारी सारख्या दमदार आणि लोकप्रिय एसयुव्हीच्या दरात कपात करण्यात आली आहे.
नवीन कारवर सवलत, किंमतीत कपात
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार डीलर्स सध्या संकटात आहेत. गेल्या 65-67 दिवसांपासून कार विक्रीच्या आकड्यात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कार कंपन्या पण चितेंत आहेत. त्यांना यापूर्वी उत्पादित कार विक्री करायची आहे, स्टॉक कमी करायचा आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी आता डिस्काऊंट ऑफरचा भडिमार केला आहे. किंमतीत सूट दिल्यास विक्री वाढण्याची शक्यता त्यांना वाटत आहे.
टाटा आणि महिंद्रा एसयुव्हीच्या भावात कपात
टाटा मोटर्स आणि महिंद्राच्या लोकप्रिय एसयुव्हीच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. टाटा हॅरियर आणि सफारीच्या काही मॉडेल्सचा भाव 50,000 रुपये ते 70,000 रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. महिंद्रा कंपनीने पण XUV700 ची किंमत कपात केली आहे. आता ही कार जवळपास 2 लाख रुपयांपर्यंत स्वस्त मिळत आहे. XUV700 च्या व्हेरिएंट्स आधारावर फायदा मिळेल.
या कारवर जबरदस्त सूट
मारुती सुझुकीने एरिना आणि नेक्सा डिलरशीपच्या कारवर 15,000 रुपयांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. विक्रीत आघाडी घेतलेल्या एक्सटर नाईटवर 10,000 रुपये आणि स्टँडर्ड Exter वर 20,000 रुपयांपर्यंतची सवलत मिळणार आहे. Tucson, अल्काजार, व्हेन्यू सारख्या काही मॉडल्सवर 2 लाख रुपयांपर्यंतची सवलत देण्यात येणार आहे.
होंडा एलिवेटवर 70,000 रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. होंडा सिटीवर 1 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. फॉक्सवॅगन आणि स्कोडाच्या कारवर 1.5 लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळले. ही ऑफर केवळ जुलै 2024 पर्यंत आहे.