Electric Vehicle चार्ज करताना या चुका टाळा, नाहीतर गाडी होऊ शकते जळून खाक
जर तुमच्याकडेही इलेक्ट्रिक गाडी असेल तर पुढच्या वेळी तुमच्या वाहनाची बॅटरी चार्ज करण्यापूर्वी या 3 गोष्टी जाणून घ्या. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
नवी दिल्ली : सध्या ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) मागणी वाढत आहे, तसेच सरकार EVs ला प्रोत्साहन देण्यासाठी बरेच प्रयत्न करत आहे. पण इलेक्ट्रिक वाहनांना आग (catching fire) लागण्याच्या घटनाही सातत्याने समोर येत आहेत, हेही तितकंच खरं आहे. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन असेल, मग ती एखादी कार असो वा स्कूटर अथवा बाईक, तर त्यांची बॅटरी चार्ज (charging the battery) करताना काही चुका टाळल्या पाहिजेत.
ओव्हरचार्जिंग पडू शकते महागात
कोणतीही गोष्ट अती प्रमाणात किंवा प्रमाणाबाहेर केली की त्यामुळे नुकसान अथवा त्रास होऊ शकतो, हे तर तुम्हाला माहीत आहेच. त्याचप्रमाणे ओव्हरचार्जिंगमुळेही तुमच्याकडील डिव्हाईसचे नुकसान होते. ओव्हरचार्जिंग बॅटरीच्या आरोग्यासाठी अजिबात सुरक्षित नाही, मग ती फोनची असो किंवा तुमच्या इलेक्ट्रिक वाहनाची. त्यामुळे जेव्हा पुढल्या वेळेस तुम्ही तुमचे इलेक्ट्रिक वाहन चार्ज कराल, तेव्हा तुमचे इलेक्ट्रिक वाहन 100 टक्के चार्ज झाल्यानंतर लगेच बंद करा. त्यानंतरही चार्जिंग सुरू ठेवण्याची चूक बिलकूल करू नका.
बॅटरी सतत चार्जिंगला ठेवल्याने बॅटरीवरही वाईट परिणाम होतो, अशा स्थितीत इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी ओव्हरचार्ज करण्याची चूक टाळली पाहिजे, असे म्हटले जाते.
पूर्ण बॅटरी संपवूही नका
इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी पूर्णपणे रिकामी झाल्यानंतर किंवा संपल्यानंतर कधीही चार्ज करू नका. असे केल्याने बॅटरीवर परिणाम होतो. वाहनाची बॅटरी जेव्हा 20 टक्क्यांपर्यंत येते, तेव्हाच गाडी चार्जिंगला लावणे योग्य ठरते.
गाडी चालवल्यानंतर चुकूनही करू नका हे काम
इलेक्ट्रिक वाहनात असलेली लिथियम आयन बॅटरी ही वीज पुरवताना किंवा पॉवर सप्लाय करताना उष्णता निर्माण करते. अशा वेळी बॅटरी थंड झाल्यावरच बॅटरी चार्ज करावी. म्हणूनच गाडी चालवून झाल्यावर लगेचच त्याची बॅटरी चार्जिंगला लावू नये, अन्यथा स्फोट होऊन आग लागण्याची, दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असते.
का लागू शकते आग ?
इलेक्ट्रिक स्कूटरचा स्पीड जेव्हा नियंत्रणात असतो, तेव्हा ती स्कूटर व्यवस्थित चालते. मात्र जेव्हा स्पीड जास्त असते तेव्हा लिथियम आयन बॅटरीवरील ताण वाढतो. ताण वाढल्याने शॉर्टसर्कीट होते आणि स्कूटर पेट घेत असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे एखाद्या अपघातामध्ये किंवा अन्य काही कारणामुळे जर बॅटरी थोडी जरी डॅमेज झाली असेल तरी देखील आग लागण्याची शक्यता वाढते.