हमारा बजाज…! चेतक इलेक्ट्रिक स्कुटरची रेंज आता इतक्या टक्क्यांनी वाढणार, कसं काय ते जाणून घ्या
बजाज ऑटोनं भारतीय बाजारात एक सुवर्णकाळ गाजवला आहे. बजाज चेतकची तर ग्राहकांकडून मोठी मागणी होती. आता कंपनीने आपल्या मोर्चा इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे वळवला आहे.
मुंबई : बुलंद भारत की बुलंद तस्वीर हमार बजाज…! ही जाहीरात तुम्ही लहानपणी नक्कीच ऐकली असेल. नुसतं आवाज जरी कानावर पडला तरी धावत टीव्ही जवळ पोहोचायचे. बजाज कंपनीच्या प्रोडक्टचे आजही लाखो चाहते आहेत. काळानुरूप बजाज चेतकनं कात टाकली आणि इलेक्ट्रिककडे मोर्चा वळवला. पण इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हवी तशी रेंज मिळत नसल्याने ग्राहकांना पाठ वळवली होती. आता लवकरच बजाज ऑटो चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचं अपडेटेड वर्जन लाँच करणार आहे. आरटीओ डॉक्युमेंटनुसार, बजाज चेतकची रेंज टक्क्यांनी वाढणार आहे. यामुळे चेतक इलेक्ट्रिक स्कुटर 108 किमी सिंगल चार्जवर धावणार आहे. सध्याचं वर्जन पूर्ण चार्जवर 90 किमीपर्यंत रेंज देते. नव्या अपडेटेड स्कुटरमध्येही आधीप्रमाणेच 2.88 किलोवॅटची बॅटरी असणार आहे.
बजाज ऑटोनं आपल्या सॉफ्टवेअर अपडेट केल्याने रेंजवर फरक दिसून आला आहे. पण याबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. माहितीप्रमाणे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम आणखी प्रभावी केलं असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपडेट चेतक इलेक्ट्रिकची रेंज वाढली आहे. लीक झालेल्या कागदपत्रानुसार, पॉवर आउटपूटमध्येही काही बदल करण्यात आले आहेत.स्कूटरमध्ये 4 किलोवॅट पीएमएस मोटर असून त्यामुळे मागच्या चाकांना आणखी उर्जा मिळते. या गाडीचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास इतका आहे. या गाडीतील फीचर्स म्हणाल तर एलसीडी युनिट, एल्युमिनेटेड सॉफ्ट टच स्विचगियर आणि मेटल बॉडी आहे.
बजाज चेतक इलेक्ट्रिकची रेंज वाढणार असल्याने स्कुटरप्रेमी खूश आहेत. ही गाडी टीव्हीएस आयक्यूब एस व्हेरियंटशी स्पर्धा करेल.ही गाडी एका चार्जवर 100 किमी धावते.दुसरीकडे विदा व्हि1 प्रो, अॅथर 450 एक्स आणि ओला एस 1 अनुक्रमे 165 किमी, 146 किमी आणि 170 किमीची रेंज देतात.
बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कुटरची किंमत सध्या 1.51 लाख (एक्स शोरुम) इतकी आहे. त्यामुळे अपडेटेड वर्जनची किंमत कमी होईल, असं अजिबात नाही. पण मॉडेल एकदम चांगलं असल्याने प्रतिस्पर्धी कंपन्यांशी चांगल्या प्रकारे स्पर्धा करेल यात शंका नाही. बजाज कंपनीने 2020 मध्ये आपल्या चेतक स्कूटरचे इलेक्ट्रिक वर्जन बाजारात आणले होते. आता कंपनी 2023 मध्ये ग्राहकांना अधिक ड्रायव्हिंग रेंज आणि नवीन फीचर्स देण्याची तयारी केली आहे.