1 एप्रिलपासून वाढणार कारच्या किंमती, वाहनांमध्ये होणार हा मोठा बदल!
मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्स, होंडा कार्स, किया इंडिया आणि एमजी मोटर इंडियाने त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिल पासून वाहनांमध्ये हा मोठा बदल होणार आहे.
मुंबई : भारतात 1 एप्रिलपासून नवीन उत्पादन मानक (BS 7) लागू केले जाणार आहेत. यामुळे, वाहन उत्पादकांनी बीएस 6 च्या दुसऱ्या टप्प्यातील उत्पादन नियमांनुसार (BS 6 Phase 2) वाहने बनवणे किंवा जुन्या वाहनांचे इंजिन अद्ययावत करणे सुरू केले आहे. त्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. यामुळेच ऑटोमोबाईल कंपन्यांनी 1 एप्रिलपासून कारच्या किमतीत 2 ते 5 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे, जी वाहनांच्या मॉडेल आणि इंजिन क्षमतेनुसार 10 ते 50 हजार रुपयांनी वाढू शकते.
या कंपन्यांनी जाहीर केली दरवाढ
मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्स, होंडा कार्स, किया इंडिया आणि एमजी मोटर इंडियाने त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. या वाढलेल्या किमती 1 एप्रिलपासून लागू होतील. मारुतीने गुरुवारी किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे, मात्र ही वाढ किती असेल याची माहिती दिलेली नाही. Honda Cars India आपल्या एंट्री-लेव्हल कॉम्पॅक्ट सेडान कार Amaze ची किंमत 1 एप्रिलपासून 12,000 रुपयांनी वाढवणार आहे. त्याचवेळी टाटा मोटर्सनेही पुढील महिन्यापासून आपल्या वाहनांच्या किमती 5 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे.
वाहने महागली
BS6 फेज-2 मानकांनुसार, वाहनांमध्ये अशी उपकरणे बसवणे बंधनकारक असेल. जे वाहन चालवत असताना एकाच वेळी उत्सर्जनावर लक्ष ठेवू शकते. हे उपकरण कारमध्ये उपस्थित असलेल्या कैटेलिक कन्वर्टर आणि ऑक्सिजन सेन्सर्सचे निरीक्षण करेल आणि उत्सर्जन निर्धारित मानकांपेक्षा जास्त असल्यास चेतावणी देईल. त्यासाठी वाहन उत्पादकांना वाहनांमधील हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करावे लागतील. यात सेमीकंडक्टर अपग्रेड देखील समाविष्ट आहे.
काही कंपन्यांनी जाहीर केल्या वाढीव किमती
Kia India ने आतापासून त्यांच्या कारच्या किमतीत 2 ते 3 टक्क्याने वाढवल्या आहेत, आता Sonet, Seltos आणि Carens च्या अपडेटेड व्हेरियंटची किंमत अनुक्रमे 7.79 लाख, 10.89 लाख आणि 10.45 लाख आहे. एमजी मोटर इंडियाने या महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपल्या वाहनांच्या मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. आता एमजी ग्लोस्टर आणि हेक्टर डिझेल मॉडेलवर 60,000 रुपयांनी आणि हेक्टर पेट्रोल मॉडेलवर 40,000 रुपयांनी महागले आहे.
हे आहेत BS-6 स्टेज 2 नियम
नवीन उत्सर्जन मानदंड ‘रिअल ड्रायव्हिंग एमिशन्स’ (RDE) म्हणून ओळखले जातात कारण ते वाहन उत्सर्जनाचे वास्तविक-वेळ निरीक्षण करण्यास अनुमती देईल. नवीन उत्सर्जन मानदंड लागू झाल्यानंतर, भारतीय बाजारपेठेत उपलब्ध वाहने युरो 6 स्टेज उत्सर्जन मानदंडांच्या बरोबरीने उभी राहतील.