मायलेजची नाही चिंता, पेट्रोल बाईकला करा टाटा, ही कंपनी करणार असा धमाका
Bajaj CNG Bike | दिग्गज दुचाकी कंपनी बजाज लवकरच तिची सीएनजी (CNG) वर धावणारी बाईक बाजारात उतरविण्याच्या तयारीत आहे. ही बाईक एक किलो सीएनजीमध्ये 80Km चे मायलेज देणार आहे. त्यामुळे पेट्रोलपेक्षा ही बाईक ग्राहकांन स्वस्त ठरु शकते.
नवी दिल्ली | 14 March 2024 : कार निर्मिती कंपन्यांप्रमाणेच बाईक कंपन्या पण वाहनांपासून उत्सर्जित होणाऱ्या कार्बनची समस्या सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचे युग येऊ घातलं आहे. तर या स्पर्धेत देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोने तर जोरदार आघाडी उघडली आहे. कंपनी सीएनजी, एलपीजी दुचाकी आणण्याची तयारी करत आहे. सीएनजी बाईकची तर किती दिवसांपासून प्रतिक्षा आहे. आता बाईक प्रेमींना फार काळ वाट पहावी लागणार नाही. कारण बजाजच्या सीएनजी बाईकची चाचणी सुरु झाली आहे. ती लवकरच बाजारात उतरण्याची दाट शक्यता आहे.
कधी येणार बाजारात
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दादा कंपनी बजाजने नवीन कार्ड खेळले आहे. सध्या बाजारात पेट्रोलला पर्याय देण्याचा प्रयत्न ही कंपनी करत आहे. एका दाव्यानुसार, कंपनी CNG Bike ची टेस्टिंग करत आहे. रस्त्यावरील चाचणीसाठी ही दुचाकी बाहेर पडल्याचा दावा एका छायाचित्राच्या आधारे करण्यात येत आहे. आता ही बाईक बाजारात कधी दाखल होणार हा प्रश्न आहे. एका दाव्यानुसार ही बाईक एप्रिल-जून 2024 दरम्यान भारतीय बाजारपेठेत उतरविण्यात येईल.
काय आहे खास
- नवीन बाईकमध्ये टेलिस्कोपिक फोर्क, फ्रंट डिस्क ब्रेक, एलिव्हेटेड हँडलबार असेल
- अपराइट राइडिंग पोझिशन,अलॉय व्हील, वळणदार आणि मोठी टाकी असेल
- या बाईकमध्ये मोनोशॉक असण्याची शक्यता आहे.
- फ्युएल टँकच्या वरती रिफलिंग वॉल्व देण्यात आला आहे. बाईकची लांबी अधिक आहे.
- सीएनजी संपल्यास इमरजन्सीमध्ये पेट्रोलची छोटी टँक पण देण्यात आली आहे
- ही बाईक सीएनजी टू पेट्रोल आणि पेट्रोल टू सीएनजी अशी स्वीच करता येईल
- डिजिटल फ्युएल इंडिकेटर, टीएफटी स्क्रीन आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी फीचर्स असतील
- पल्सर NS125 चीच ही कॉपी असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे
- तर काही जण ती प्लॅटिना सारखी असल्याचा दावा करत आहेत
बजाज घेणार आघाडी
कंपनी इलेक्ट्रिक बाईक, सीएनजी बाईकच नाही तर कंपनी एलपीजी, इथेनॉलवर पण बाईक आणण्याच्या तयारीत आहे. सीएनजी बाईक उत्पादनाचे लक्ष्य पण ठरविण्यात आले आहे. त्यानुसार, कंपनी जवळपास 1 ते 1.20 लाख वाहनांचे दरवर्षी उत्पादन करण्यावर भर देत आहे. भविष्यात ही क्षमता 2 लाख युनिटपर्यंत वाढविण्यात येणार आहे.