अहमदाबाद : आपण वर्षानुवर्षे एखादी गाडी वापरत असू तर साहजिकच त्या वाहनाशी आपला भावनिक बंध तयार होतो. त्यामुळे गाडी विकायची किंवा जुनी झाल्यामुळे ती भंगारात काढायची (Scrapped Vehicle) झाली तरी अनेकांच्या जीवावर येते. बऱ्याचदा एखाद्या वाहनाचा क्रमांक हीच त्या व्यक्तीची ओळख बनून जाते. अशावेळी गाडी विकल्यावर (Car Sale) अनेकांना आपली ओळख हिरावून घेतल्यासारखे वाटते. मात्र, आता गुजरात सरकारने वाहनचालकांची ही अडचण ओळखून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एखाद्या व्यक्तीने गाडी विकली किंवा भंगारात दिली तरी वाहनाचा क्रमांक (Number Plate) त्याच्याकडे कायम राहील. अर्थात वाहनाचा क्रमांक स्वत:कडे ठेवण्यासाठी शुल्क भरावे लागेल. निर्धारित शुल्क भरुन हा क्रमांक हस्तांतरित केला जाऊ शकतो.
गुजरातचे परिवहन मंत्री पूर्णेश मोदी (Purnesh Modi) यांनी नुकतीच याबाबत घोषणा केली. त्यांनी म्हटले की, वाहनाचा क्रमांक स्वत:कडे ठेवण्याची व्यवस्था दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये आधीच अस्तित्वात आहे आणि आता ती गुजरातमध्ये सुरू करण्यात आली आहे. लोक त्यांच्या वाहन नोंदणी क्रमांकाशी धार्मिक श्रद्धा किंवा अंकशास्त्र यांसारख्या अनेक कारणांनी जोडलेले असतात. काही वाहनधारक भावनिकदृष्ट्या त्या नंबरशी जोडलेले असतात. त्यामुळे जुनाच नंबर परत मिळावा, अशी मागणी नेहमीच वाहनमालकांकडून होत असते. त्यामुळे आता गुजरातमधील वाहनधारक त्यांचे वाहन विकल्यानंतर किंवा स्क्रॅप केल्यानंतरही जुनाच नंबर कायम ठेवू शकतात,”
“राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक मालकाने खरेदी केलेल्या नवीन वाहनासाठी हस्तांतरित केला जाऊ शकतो. परंतु तो क्रमांक जुन्या किंवा आधीच नोंदणीकृत असलेल्या वाहनासाठी वापरता येणार नाही. तसेच दोन्ही वाहनांचा मालक आणि ब्रँड एकच असणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्तीने नोंदणी क्रमांक राखून ठेवला आहे, त्याने नवीन बाईक खरेदी केली, तर त्या बाईकसाठी हा क्रमांक हस्तांतरित केला जाऊ शकत नाही. जी वाहने आधीच स्क्रॅप केली आहेत, त्यांचा क्रमांक आता परत मिळवता येणार नाही. त्याशिवाय, नंबर कायम ठेवण्यासाठी पात्र होण्यासाठी अर्जदाराकडे किमान एक वर्ष वाहन असणे आवश्यक आहे.
जुना क्रमांक कायम ठेवण्याची आणि नव्याने खरेदी केलेल्या वाहनात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया 15 दिवसांत पूर्ण होणे आवश्यक आहे. दुचाकींचा क्रमांक स्वत:कडे राखायचा असेल, तर त्यासाठी ‘गोल्डन कॅटेगरी’च्या फॅन्सी नंबरसाठी 8,000 रुपये, ‘सिल्व्हर कॅटेगरीच्या’ फॅन्सी नंबरसाठी 3,500 रुपये आणि इतर नंबरसाठी 2,000 रुपये शुल्क आकारले जाईल. कार आणि इतर चारचाकी वाहनांचा नंबर राखून ठेवण्यासाठी गोल्डन कॅटेगरीसाठी 40,000 रुपये, सिल्व्हर कॅटेगरीच्या नंबरसाठी 15,000 रुपये आणि इतर सर्व नंबरसाठी 8,000 रुपयांपासून शुल्क आकारले जाईल.
इतर बातम्या
#BoycottHyundai होतोय ट्रेन्ड! ह्युंदाईनं काश्मीरबाबत नेमकं असं काय म्हटलं, की लोकं भडकली?
मारुती सुझुकीच्या गाड्यांवर 36,000 रुपयांचा डिस्काऊंट, पाहा संपूर्ण यादी