तुम्ही बऱ्याच वेळेस यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओमध्ये किंवा रस्त्यांवरून बाईक चालवणाऱ्या काही व्यक्तींच्या हेल्मेटवर कॅमेरा (helmet mounted cameras) लावण्यात आल्याचे पाहिले असेल. काही व्लॉगर्सही बाईक चालवताना हेल्मेटवर कॅमेरा लावत, प्रवासाचे शूटिंग करत तो व्हिडीओ त्यांच्या अकाऊटवर किंवा सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र आता याच सर्व गोष्टी केरळ (Kerala) राज्यात केल्यास पश्चाताप करावा लागू शकतो. रिपोर्ट्सनुसार, केरळ राज्याच्या मोटार वाहन विभागाने (Motor Vehicle Department) नवा नियम आणला असून त्यानुसार एखादी व्यक्ती बाईक चालवत असेल आणि त्याच्या हेल्मेटवर कॅमेरा लावलेला आढळला, तर त्याच्याविरोधात कारवाई होऊ शकेल. हा नवा नियम लागू झाल्यास, हेल्मेटवर कॅमेरा लावणाऱ्या व्यक्तीला 1000 रुपये दंड भरावा लागेल. तसेच तीन महिन्यांसाठी त्या व्यक्तीचा ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द करण्यात येऊ शकतो.
केरळमधील मोटार वाहन विभागाने गेल्या वर्षीही हा नियम लागू करण्याचा प्रयत्न केला होता. सार्वजनिक रस्त्यांवरील गाड्यांच्या शर्यती, स्टंट्स आणि समाजविघातक कृत्य रोखणे, हा त्यामागचा हेतू (त्यावेळी) होता. मात्र यावर्षी कारण अतिशय वेगळे आहे. हेल्मेटवरील कॅमेऱ्यास बंदी घालण्यामागचे कारण म्हणजे, (कॅमेऱ्यामुळे) त्यामुळे हेल्मेटच्या कामगिरीवर परिणाम होतो, असे वाहन विभागातर्फे नमूद करण्यात आले आहे. चुकून एखादा अपघात झाल्यास (कॅमेऱ्यामुळे) हेल्मेटची क्षमता कमी होते, त्यामुळे बाईक चालवणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका पोहचू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
केरळच्या मोटार वाहन विभागाने, हेल्मेटवरील कॅमेऱ्यास बंदी घालण्याच्या निर्णयामागे, प्रसिद्ध फॉर्म्युला वन ड्रायव्हर मायकल शूमाकर याचे उदाहरण दिले. बर्फात स्कीईंग करताना शूमाकरचा अपघात झाला होता. त्या अपघातावेळी मायकल शूमाकरला झालेल्या दुखापतीमागचे मुख्य कारण हेल्मेटवर लावण्यात आलेला कॅमेरा होता.
मात्र काही प्रसिद्ध कंपन्यांनी केलेल्या टेस्टिंग दरम्यान असा दावा करण्यात आला आहे की, अपघात झाल्यास हेल्मेटवर पडणारा थोडा दबाव कॅमेराही झेलतो, त्यामुळे हेल्मेटवर कॅमेरा लावणे सुरक्षित आहे.
फेडरेशन इंटरनॅशनल डी ऑटोमोबाईल (FIA) या मोटरस्पोर्टच्या सर्वात मोठी प्रशासकीय संस्थेनेही हेल्मेटवर कॅमेरा लावण्यास बंदी घातली आहे. त्यानंरही तुम्हाला रायडिंग करताना कॅमेरा वापरायची इच्छा असेल तर तुम्ही मोटरसायकलवर लावलेला कॅमेरा वापरू शकता. तसेच रायडिंग जॅकेटवरही कॅमेरा लावता येऊ शकतो, अशी शिफारस काही रायडर्सनी केली आहे.