Hyundai Creta: ह्युंदाईनं क्रेटाचं हे व्हेरियंट गुपचूपपणे केलं बंद, कारण..
भारतात ह्युंदाई क्रेटाच्या मॉडेल्सना मोठी मागणी आहे. गेल्या महिन्यातील टॉप 10 यादीत ही गाडी सहाव्या स्थानावर होती. यावरूनच या गाडीची लोकप्रियता दिसून येते. मात्र आता कंपनीने या मॉडेलमधील एक व्हेरियंट बंद केलं आहे. जाणून घ्या या मागचं कारण
मुंबई- कोरियन कंपनी ह्युंदाईची गाड्यांना भारतात चांगली मागणी आहे. भारतात ह्युंदाईचं क्रेटा हे मॉडेल सर्वाधिक लोकप्रिय आहे. मागच्या महिन्यातील टॉप 10 यादीत या मॉडेलनं सहावं स्थान मिळवलं आहे.गेल्या महिन्यात सर्वाधिक मागणी असलेली एसयूव्ही ठरली होती. जानेवारी महिन्यात 15037 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात 9869 युनिट्सची विक्री झाली होती.यावरूनच या गाडीची लोकप्रियता अधोरेखित होते. मात्र असं असताना कंपनीने गुपचूपपणे 1.4 लिटर टर्बो पेट्रोल व्हेरियंट मॉडेल बंद केलं आहे. कंपनीच्या वेबसाईटवरही हे व्हेरियंट दिसत नसल्याने असाच अर्थ काढला जात आहे. मात्र कंपनीने यामागचं कारण अद्याप स्पष्ट केलेलं नाही. दुसरीकडे, गेल्याच महिन्यात कंपनीने 1.5 लिटर पेट्रोल इंजिन असलेलं व्हेरियंट लाँच केलं आहे. त्यामुळे 1.4 लिटर टर्बो पेट्रोल व्हेरियंट बंद केलं असावं असा अंदाज आहे. दुसरीकडे टर्बोचार्ज्ड इंजिनसाठीचा खर्च पाहता हा निर्णय घेतला असावा, असंही सांगण्यात येत आहे.
क्रेटा 1.4 लिटर टर्बो पेट्रोल व्हेरियंटमध्ये काय होतं?
ह्युंदाई क्रेटा 1.4 टर्बो पेट्रोल व्हेरियंटमध्ये सहा स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहेत. त्याचबरोबर सात स्पीड डीसीटी ऑटोमॅटिक युनिटही आहे. क्रेटा 1.4 टर्बो पेट्रोल इंजिन 138 बीएचपी पॉवर आणि 142 एनएम टॉर्क जनरेट करण्यात सक्षम आहे.सरकारच्या BS6 स्टेज II श्रेणीत टर्बो इंजिन बसण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे कंपनीने तसा निर्णय घेतला असावा असंही काही जाणकारांनी सांगितलं आहे.
क्रेटा 1.5 पेट्रोल-डिझेल व्हेरियंट
हयुंदाईने गेल्या महिन्यात क्रेटाचं नवं व्हेरियंट लाँच केले.एसयूव्हीमध्ये सध्या फक्त 1.5-लिटर पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. 1.5-लिटर पेट्रोल इंजिन 113 बीएचपी पॉवर आणि 6,300 आरपीएम आणि 143.8 एनएम 4,500 आरपीएम टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड आयव्हीटीसह जोडलेले आहे. दुसरीकडे 1.5 लिटर डिझेल इंजिन 114 बीएचपी पॉवर आणि 4,000 आरपीएम आणि 200 एनएम 1500 ते 2750 आरपीएम टॉर्क जनरेट करते.दोन्ही इंजिन आता RDE-अनुरूप आणि E20 इंधन संलग्न आहेत.
क्रेटाची किंमत
ह्युंदाईने गेल्याच आठवड्यात आपल्या गाड्यांच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोल व्हेरियंटची किंमत 20,000 रुपयांनी वाढली आहेत तर डिझेल क्रेटा आता 45,000 रुपयांनी महागली आहे.पेट्रोल मॉडेल आता आता 10.84 लाख ते 18.34 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किमतीत उपलब्ध आहे.तर डिझेल मॉडेल (एक्स-शोरूम) 11.89 लाख ते 19.13 लाख रुपयांच्या दरम्यान आहे.