इचलकरंजीत ‘अप्सरा’ आल्या, रिक्षा-स्प्लेंडर बाईक्सची अनोखी सौंदर्य स्पर्धा
इचलकरंजी शहरातील सर्वच रिक्षाप्रेमी आणि स्प्लेंडर प्रेमींनी आपल्या गाड्या उत्तम पद्धतीने सजवून आणल्या होत्या (Ichalkaranji Rickshaw Splender Beauty Contest)
इचलकरंजी : ‘ती आली, तिने पाहिले अन् ती जिंकली’ असं आपण एखाद्या सौंदर्यवतीबद्दल बोलतो. कोल्हापुरात 26 जानेवारीचं औचित्य साधत एका अनोख्या लावण्यवतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतले. निमित्त होतं रिक्षा आणि स्प्लेंडर सौंदर्य स्पर्धेचं. त्यामध्ये लावण्यवती ठरली ती मुन्ना चौधरी यांची रिक्षा आणि सलीम बागवान यांची स्प्लेंडर. सजावट स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आणलेल्या रिक्षा आणि दुचाकींनी उपस्थितांची वाहवा लुटली. (Ichalkaranji Rickshaw Splender Bike Beauty Contest)
फॅशन शो म्हटला, की आपल्या डोळ्यासमोर येते ते महिला आणि पुरुषांची सौंदर्य स्पर्धा. मात्र इचलकरंजीत अनोखी सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आकर्षक सजावट करुन सजवलेल्या रिक्षेला यावेळी सौंदर्यवतीचा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. रिक्षा सजावट आणि स्प्लेंडर सौंदर्य स्पर्धा झाल्यामुळे शहरात दिवसभर या स्पर्धेची चर्चा होती.
रिक्षा-स्प्लेंडर बाईक्सना अनोखी सजावट
इचलकरंजीतील मच्छिंद्र नगारे युवा शक्ती यांच्या वतीने आणि विक्रमनगर रिक्षा मित्र मंडळ व इचलकरंजी विद्यार्थी वाहतूक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा आणि स्प्लेंडर सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हौसेखातर हजारो रुपये खर्चून सजवलेल्या आकर्षक सजावटीच्या रिक्षांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
रिक्षा सौंदर्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मुन्ना फैय्याज चौधरी, द्वितीय क्रमांक अनिल साबळे तर तृतीय क्रमांक प्रकाश शिंदे यांच्या रिक्षाने पटकावला. तर स्प्लेंडर सौंदर्य स्पर्धेत सलिम बागवान, गणेश काबंळेकर आणि आकाश घाटगे यांनी यश मिळविले.
सौंदर्यवतींना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी
रिक्षा आणि स्प्लेंडर सौंदर्य स्पर्धा शहरांमध्ये घेण्यात आल्या होत्या. यामध्ये शहरातील सर्वच रिक्षाप्रेमी आणि स्प्लेंडर प्रेमींनी आपल्या रिक्षा उत्तम पद्धतीने सजवून आणल्या होत्या. या स्पर्धेला मोठी गर्दी झाली होती.
स्पर्धेचा शुभारंभ बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील व नगरसेवक विठ्ठल चोपडे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे होते. तर नगरसेवक सुनिल पाटील, मंगेश कांबुरे, लतिफ गैबान, गावभागचे सपोनि गजेंद्र लोहार, शहापूरचे पोलिस निरीक्षक प्रकाश निकम, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सपोनि नंदकुमार मोरे, धोंडीलाल शिरगांवे, इम्रान मकानदार, भाऊसो आवळे, सलीम ढालाईत, सुनिल मुधाळकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा पार पाडण्यासाठी मन्सुर सावनुरकर, फारुक चौधरी, असिफ मुल्ला यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
संबंधित बातम्या :
एका तासात थाळी संपवा, बुलेट जिंका, पुण्यातील हॉटेलची सुसाट ऑफर
(Ichalkaranji Rickshaw Splender Bike Beauty Contest)