कार विकत घेताना या गोष्टी ठेवा ध्यानात, भविष्यात येणार नाही पश्चातापाची वेळ
तुम्ही जर नव्या वर्षात नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर काही गोष्टी अवश्य ध्यानात ठेवा. यामुळे तुम्हाला पश्चातापाची वेळ येणार नाही.
मुंबई, येत्या काही दिवसांत नवीन वर्ष सुरू होणार आहे. अनेक जण नव्या वर्षात नवी गाडी (New Car) घेण्याचा विचार करतात. तुम्हीदेखील नवीन वर्षाची सुरुवात नवीन कारने करणार असाल तर वाहन खरेदी करताना काही गोष्टींची नक्की काळजी घ्या. नवीन वाहन खरेदी करताना काय करावे? कोणत्या गोष्टी ध्यानात ठेऊन कार खरेदी करावी? याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
आम्ही तुम्हाला अशाच 5 टिप्स देणार (Buying Tips) आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही वाहन खरेदी करताना मोठे नुकसान टाळू शकता. तसेच भविष्यात तुम्हाला कोणताही पश्चाताप होणार नाही. चला तर मग जाणून घेऊया वाहन खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
बजेट ध्यानात ठेवा
सर्वातआधी नवीन कार घेण्यापूर्वी तुमचे बजेट ठरवा. तुम्हाला जी कार घ्यायची आहे त्यासाठीचे तुमचे बजेट खरोखरच आहे का? हे एकदा तपासून पहा. अनेकजण सुरुवातीला महागड्या गाड्या घेतात आणि नंतर हप्ते भरणे कठीण जाते. म्हणूनच तुमच्या बजेटपेक्षा जास्त महाग असलेली कार तुम्ही घेऊ नये.
गाडीचा प्रकार निवडा
भारतीय वाहन बाजारात कारचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तसेच, भारतात वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कारचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बाजारात 3.39 लाख रुपयांपासून ते करोडो रुपयांपर्यंतच्या कार उपलब्ध आहेत. भारतात हॅचबॅक, सेडान, एमपीव्ही आणि एसयूव्हीला मोठी मागणी आहे. भारतात हॅचबॅक सेगमेंटमधील वाहनांना नेहमीच जास्त मागणी राहिली आहे. तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या पसंतीच्या कारचा प्रकार निवडा.
इंधन प्रकार लक्षात घ्या
कार खरेदी करताना, तुम्ही कारचा इंधन प्रकार निवडावा. म्हणजेच, तुम्हाला कोणत्या इंधनावर कार चालवायची आहे, पेट्रोल, डिझेल, सीएनजी की इलेक्ट्रिक हे आधीच ठरवा. तुम्ही तुमची कार कुठे आणि किती वापरणार यावर इंधनाच्या प्रकारावर अवलंबून असते.
लगेच गाडी बुक करू नका
जेव्हा तुम्ही नवीन कार खरेदी करत असाल तेव्हा डीलरला भेट देऊन डील फायनल करू नका. वाहन खरेदी करताना तुम्ही 2 ते 3 किंवा अधिक डीलर्सना भेट द्या. असे केल्याने तुम्ही सर्वोत्तम डील निवडण्यास सक्षम असाल.
ब्रॅण्डची निवड काळजीपूर्वक करा
कार खरेदी करण्यापूर्वी विशिष्ट ब्रँडच्या गाडीचा ऑनलाईन रिव्हिव्ह पहा. गाडीमध्ये असलेल्या कमतरता आणि इतर नकारात्मक बाबी जाणून घ्या. सुरक्षेसंबंधित फीचर्सला प्राधान्य द्या.