e-bikes खरेदीत महाराष्ट्राने ओलंडला इतक्या लाखांचा टप्पा, देशात रचला इतिहास
e-bikes | देशात इलेक्ट्रिक व्हेईकलची संख्या दिवसागणिक वाढत आहे. देशात महाराष्ट्राने त्यात विक्रम नोंदवला आहे. देशात सर्वाधिक ई-बाईकची खरेदी राज्यात झाली आहे. याविषयीची आकडेवारी सर्वांचेच लक्ष वेधणारी आहे. गेल्या 50 दिवसांत तर राज्याने मोठी आघाडी घेतली आहे. 40,000 नवीन ई-बाईक्सची नोंदणी झाली आहे.
निवृत्ती बाबर, मुंबई | 7 नोव्हेंबर 2023 : देशात सध्या ई-बाईक्सची मोठी मागणी आली आहे. इलेक्ट्रिक बाईक्सच्या किंमती अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्यात नसल्या तरी पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतींनी या वाहनांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. केंद्र सरकारने ई-बाईक्सला चालना देण्यासाठी काही सवलती दिल्या आहेत. त्याचा पण परिणाम दिसून आला आहे. महाराष्ट्राने तर प्रदुषणरहित वाहनांना मोठी पसंती दिली आहे. देशात सर्वाधिक ई-बाईकची नोंद राज्यात झाली आहे. गेल्या 50 दिवसांत राज्यात 40,000 नवीन ई-बाईक्सची नोंदणी झाली आहे. इतकेच नाही तर देशात ई-बाईक खरेदीत राज्य अव्वल ठरले आहे.
40 हजार नवीन खरेदी
ई-बाईक खरेदीत महाराष्ट्राने 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या 50 दिवसांत 40 हजार ई-बाईकची विक्रमी नोंदणी झाली आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक इलेक्ट्रिक बाइक्स असलेले राज्य ठरले आहे. संपूर्ण राज्यात इलेक्ट्रिक बाईक्समध्ये 15% वाढीसह वाहतुकीसाठी स्वच्छ इंधनाकडे जाण्याचा कल वाढल्याचे दिसून येते. केवळ शहरीच नाही तर निमशहरी आणि ग्रामीण भागात पण ई-वाहनांचे प्रमाण लक्षणिय वाढले आहे. यावर आधारीत इको सिस्टिम उभी राहत आहे.
महाराष्ट्र अग्रेसर
राज्यात 3 लाख ई-बाईकची विक्रमी विक्री झाली आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक राज्यातील जनतेने ई-बाईकला पसंती दिली आहे. कर्नाटक राज्यात 2.4 लाख इलेक्ट्रिक दुचाकी आहेत आणि तामिळनाडूमध्ये 1.7 लाख ई-बाईक आहेत. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यभरातील इलेक्ट्रिक बाइक्समध्ये 15% वाढ झाली आहे.
अनेक स्टार्टअप्स मैदानात
ई-बाईक मार्केटला चालना मिळाल्याने अनेक स्टार्टअप्स मैदानात उतरले आहे. ई वाहन निर्मिती क्षेत्रात पुरक उद्योगांना पण चालना मिळाली. अनेक उद्योग त्यामुळे बहरले आहे. ई वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या, बॅटरी, इतर स्पेअर पार्ट्स, तंत्रज्ञान पुरवणाऱ्या कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ई-बाईकसह ई-कारची बाजारपेठ पण वाढत आहे. लवकरच देशात मोठ्या प्रमाणात ई-कारची निर्मिती होईल. कॉम्पॅक्ट कार निर्मितीत काही वाहन कंपन्या उतरल्या आहेत. त्यामुळे मध्यमवर्गाच्या बजेटमधील ई-वाहनांची संख्या वाढेल, तसा हा आकडा लक्षणीय असेल.