वाढत्या इंधनाच्या किमती पाहता पेट्रोल व डिझेलला पर्याय म्हणून कार निर्मात्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक कारची चाचपणी करताना दिसून येत आहेत. पेट्रोल व डिझेल व्हेरिएंटच्या तुलनेत या कार महाग असल्याने अनेकदा ग्राहक त्या घेण्याबाबत विचार करताना दिसतात. परंतु इंधनाच्या वाढत्या किमती बघता त्यांना काही अंशी मागणी वाढली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक कारच्या सेगमेंटमध्ये गती आलेली दिसून येत आहे. अनेक जण बजेट इलेक्ट्रिक कारच्या शोधात आहेत, सध्या टाटाच्या (Tata Motors) इलेक्ट्रिक कार (electric cars) बजेटमध्ये उपलब्ध आहेत. त्यांची सुरुवातीची किंमत सुमारे 12.24 लाख रुपये आहे. परंतु नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार महेंद्रा याहून स्वस्त दरामध्ये आपली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. ‘महेंद्रा ईकेयुव्ही 100’ला (Mahindra ekuv100) या वर्षाच्या शेवटी लाँच करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महेंद्रा ईकेयुव्ही 100 ला 2020 ऑटो एक्स्पोमध्ये शोकेस केले गेले आहे. या कारच्या शेवटच्या व्हर्जनवर काम करण्यात येत आहे. काँसेप्ट व्हर्जनमध्ये 15.9 किलोव्हॅटची बॅटरी देण्यात आली आहे. यात सिंगल इलेक्ट्रिक मोटर्स दिली असून ही फ्रंट एक्सेलवर आहे. ही मोटर 54.5 पीएच आणि 120 एनएमचे पीक टॉर्कसोबत उपलब्ध आहे. एका सिंगल चार्जवरही ही कार 150 किलोमीटर ड्रायव्हिंग रेंज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.
दरम्यान, महेंद्राच्या केयुव्ह नेमप्लेट पाहिजे तशी यशस्वी ठरलेली नाही. त्यामुळे आता महेंद्रा अँड महेंद्रा भारतात ईकेयुव्हीला e2o नावाने नवा पर्याय बाजारात आणू शकते. ही एक हॅचबॅक सेगमेंटमधील कार असण्याची शक्यता आहे. या कारची किमत 8.25 लाख रुपये असण्याचे बोलले जात असू या कारला सब्सिडीदेखील देण्यात येणार आहे.
2020 च्या ऑटो एक्सपोमध्ये याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले होते, की एप्रिल 2020 मध्ये या कारची विक्री सुरु होणार होती, परंतु नंतर हे नियोजन पुढे ढकलण्यात आले. तेव्हापासून ते आतापर्यंत अनेक कच्चा मालाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने साहजिक आता या कारच्या किमतीत काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे.
‘गाडीवाडी’ नावाच्या एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, महेंद्राची ही नवीन इलेक्ट्रिक कार आतापर्यंतची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असणार आहे. दरम्यान, टाटा टिगोर ईवीची सुरुवातीची किमत 12.24 लाख आणि टाटा नेक्सॉनची किंमत 14.54 लाख रुपये एक्सशोरुम किंमत आहे. त्या तुलनेत महेंद्राने ही कार त्याहून कमी किंमतीत बाजारात आणल्यास चांगली स्पर्धा बघायला मिळण्याची शक्यता आहे.