Mahindra EV : महिंद्रा आणतेय इलेक्ट्रीक कारची नवीन रेंज, महिंद्रा ठरू शकते का गेम चेंजर?
कंपनी जागतिक गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या निधीचा वापर इलेक्ट्रिक वाहनांच्या युनिटचा विस्तार करण्यासाठी करेल. युनिटच्या विस्तारामुळे इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याची क्षमताही वाढेल.
मुंबई : महिंद्रा (Mahindra Car) ऑटो ही भारतातील आघाडीची SUV निर्माता कंपनी लवकरच एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहने (Electric Car) सादर करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी यासाठी एक युनिट स्थापन करणार असून कंपनी त्या युनिटसाठी अनेक कोटी रुपये उभे करण्याची तयारी करत आहे. कंपनी निधी उभारण्यासाठी जागतिक गुंतवणूकदारांशी चर्चा करत आहे. या गुंतवणूकदारांकडून कंपनीला एक अब्ज ते 1.3 अब्ज दरम्यान निधी मिळू शकेल अशी अपेक्षा आहे.
गुंतवणूक मिळाल्यास कंपनीची योजना काय आहे?
अहवालानुसार, कंपनी जागतिक गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या निधीचा वापर इलेक्ट्रिक वाहनांच्या युनिटचा विस्तार करण्यासाठी करेल. युनिटच्या विस्तारामुळे इलेक्ट्रिक वाहने तयार करण्याची क्षमताही वाढेल आणि बाजारपेठेत वाढ होऊन कंपनीला याचा फायदा होईल.
यावर कंपनीने काय सांगितले?
महिंद्राने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. याबाबत कंपनीने कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. परंतु कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना इलेक्ट्रिक युनिटचे शेअर्स देऊन निधी मिळवू शकेल अशी अपेक्षा आहे. सरकारने ठरवलेले लक्ष्य लक्षात घेऊन महिंद्राकडून धोरणे आखली जात आहेत. स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (SUV) आणि जीपसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीने आपली EV क्षमता वाढवण्यासाठी गुंतवणूक वाढवली आहे कारण भारत सरकारने 2030 पर्यंत एकूण वार्षिक कार विक्रीमध्ये EV चा वाटा सध्याच्या 1% वरून 30% वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
कसा आहे कंपनीचा पोर्टफोलिओ
सध्या, महिंद्रा ऑटो विविध विभागांमध्ये एसयूव्ही विकते. हे कॉम्पॅक्ट SUV पासून मध्यम आकाराच्या SUV पर्यंत आहेत. कंपनी XUV300, XUV700, Mahindra Scorpio Classic, Scorpio N, Bolero Classic, Bolero Neo तसेच XUV400 इलेक्ट्रिक सारख्या SUV विकते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या फक्त एक इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे.