EVX SUV: मारुती सुझुकी कंपनीची इलेक्ट्रिक कार अखेर रस्त्यावर, काय आहे खासियत जाणून घ्या
मारुती सुझुकीच्या पहिल्या वहिल्या इलेक्ट्रिक कारची टेस्ट ड्रायव्हिंग सुरु झाली आहे. रस्त्यावर मारुतीची गाडी पाहताच अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. गाडीचा लूक, वैशिष्ट्ये आणि क्षमता कारप्रेमींना भावली आहे.

मुंबई : मारुती सुझुकीच्या गाड्यांना देशभरात पहिली पसंती मिळते. दर महिन्याला येणाऱ्या आकडेवारीवरून ही बाब वारंवार अधोरेखित झाली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक कार कधी येणार असा प्रश्न कारप्रेमींना पडला होता. ग्राहकांची ही गरज ओळखून काही दिवसांपूर्वी ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीने कन्सेप्ट कार लाँच केली होती. आता ही गाडी रस्त्यावर धावताना दिसल्याने आनंद व्यक्त होत आहे. ही मारुती सुझुकी कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे. मारुतीच्या गाड्या स्वस्त आणि मस्त असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणाऱ्या असतात. त्यामुळे ही इलेक्ट्रिक बजेट कार असेल असा अंदाज वर्तवला जात आहेय ही इलेक्ट्रिक कार टाटा, महिंद्रा यासारख्या दिग्गज कंपन्यांच्या गाड्यांशी स्पर्धा करेल. मारुती eVX suv 2025 पर्यंत बाजारात येईल असं सांगण्यात येत आहे.
मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार
मारुती eVX या कारची टेस्टिंग सुरु असून लवकरच कार बाजारात दाखल होणार आहे. नुकतेच या कारच्या टेस्टिंग दरम्यान प्रोटोटाइप मॉडलचे फोटो समोर आले आहेत. मारुती eVX कारला पोलंड देशातील क्राकोवमध्ये एका चार्जिंग स्टेशनवर स्पॉट केले आहे. कारचा लूक लपवण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचा आकार आणि इतर बाबी स्पष्टपणे दिसत होत्या. ऑटोगॅलेरिया या वेबसाईटने या कारचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
मारुती सुझुकी इलेक्ट्रिक कारचा लूक
ऑटो एक्स्पोमध्ये सादर केलेल्या कॉन्सेप्ट कार आणि प्रत्यक्षात रस्त्यावर उतरलेल्या कारमध्ये तसा काही फारसा फरक नाही. ब्लँक्ड ऑफ ग्रील आणि एल शेप्ड हेडलँपनं लक्ष वेधून घेतलं. यात फ्लेयर्ड व्हील आर्च आणि सी पिलर माउंटेड रियर डोअर पाहायला मिळाले. मागच्या बाजूस स्लिम रॅपअराउंड टेललाइट्स आणि इंटिग्रेटेड रुफ स्पॉयलर प्रथमदर्शनी दिसून आलं. त्यामुळे कारप्रेमींना स्वप्नवत वाटणारी कारची अनुभूती प्रत्यक्षात लवकरच मिळणार आहे.
@Maruti_Corp has started testing its upcoming and first-ever electric car, the #eVX Concept in #Europe which was spotted in camouflaged avatar. We can hope it launches by 2025. pic.twitter.com/u6ERNTWwkj
— Autophare (@autophareind) June 23, 2023
मारुती सुझुकी इलेक्ट्रिक कारचं एक्स्टेरियर आणि क्षमता
मारुतीच्या इलेक्ट्रिक कारची लांबी रूंदी आणि उंची हा चर्चेचा विषय आहे. कारण त्यावरून गाडी फॅमिलीसाठी किती आरामदायी आहे याचा अंदाज मिळतो. मिळालेल्या माहितीनुसार, गाडीची लांबी 4300 मीमी, रुंदी 1800 मीमी आणि उंची 1600 मीमी आहे. त्यामुळे ग्राउंड क्लियरन्स बऱ्यापैकी असल्याचा अंदाज येतो.मारुती eVX suv कारमध्ये 60 kWh क्षमतेची बॅटरी असून सिंगल चार्जमध्ये 550 किलोमीटरपर्यंत धावणार आहे.