Maruti Suzuki : बाजारात लवकरच दाखल होणार अल्टोचे नवीन व्हर्जन; जाणून घ्या फिचर्स
अल्टोच्या दोन व्हेरिएंट या आधीच सादर करण्यात आल्या असून, हे व्हेरियंट तिसऱ्या व्हर्जनचे (New version) मॉडेल असेल. यामध्ये नवीन K10C 1.0 लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. जे 89 Nm चा पीक टॉर्क आणि 67 hp पॉवर देते.
देशातील सर्वात मोठी वाहन निर्मिती कंपनी असलेली मारुती सुझुकी (Maruti Suzuki) भारतीय कार बाजारात एकापाठोपाठ एक कार्सचे नवीन व्हर्जन किंवा संपूर्ण नवीन कार लाँच करित आहे. आता कंपनीने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या अल्टोचे नवीन व्हर्जन (New version) लाँच करण्याची तयारी केली आहे. पुढील महिन्यात ते ग्राहकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 2000 साली लाँच झालेली मारुतीची अल्टो (Alto) काही वर्षांतच देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली. 20 वर्षांत कंपनीने 40 लाखांहून अधिक कार विकल्या आहेत. मात्र, त्यानंतर तिची विक्री कमी होऊ लागली, मात्र आता पुन्हा एकदा ही कार नव्या अवतारात दाखल होणार आहे, त्यामुळे कारला ग्राहकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे बघावे लागणार आहे.
इंजिनपासून ते डिझाइनपर्यंत अनेक बदल
दरम्यान, मारुती सुझुकी इंडिया लवकरच आपल्या अल्टोचे पुढील व्हर्जनचे मॉडेल सादर करणार असून, या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या रिपोर्ट्सनुसार, कंपनी ऑगस्ट 2022 मध्ये ही कार बाजारात आणण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये मारुतीने नवीन अल्टोची चाचणी देखील सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे. कारची झलक लीक झाली असून रोड टेस्टींग दरम्यान नवीन अल्टो दिसून आली आहे. इंजिनपासून ते डिझाइनपर्यंत अनेक बदल नव्या अल्टोमध्ये पाहायला मिळतात.
जुन्या मॉडेलपेक्षा खूप वेगळी
या कारबाबत नुकत्याच समोर आलेल्या बातम्यांनुसार, अल्टोचे अपकमिंग व्हेरिएंट जुन्या मॉडेलपेक्षा वेगळे असेल. त्याला नवा प्लॅटफॉर्म आणि पॉवरट्रेन देण्याची चर्चाही रंगली आहे. मॉड्युलर हार्टेक्ट प्लॅटफॉर्मवर ही कार तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या सेगमेंटमधील इतर कंपन्यांनी लाँच केलेल्या कारशी स्पर्धा करण्यासाठी कंपनी आपल्या डिझाइनमध्येही मोठा बदल करणार आहे.
दोन इंजिनचा पर्याय
अल्टोच्या दोन व्हेरिएंट याआधीच सादर करण्यात आल्या असून, हे व्हेरियंट तिसऱ्या व्हर्जनचे मॉडेल असेल. यामध्ये नवीन K10C 1.0 लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. जे 89 Nm चा पीक टॉर्क आणि 67 hp पॉवर देते. रिपोर्ट्समध्ये अशीही शक्यता आहे, की कंपनी नवीन अल्टो दोन इंजिन पर्यायांमध्ये बाजारात आणण्याची शक्यता आहे.
सीएनजी प्रकार देखील अपेक्षित
अल्टोच्या थर्ड जनरेशन मॉडेलमधील बदलांबद्दल सांगायचे झाल्यास, हेडलॅम्प आणि फॉग लॅम्पमध्ये बदल पाहिले जाऊ शकतात याशिवाय मेश ग्रिलचा फ्रंट बंपर देखील बदलण्याची शक्याता आहे. आणखी एक मोठी गोष्ट समोर येत आहे ती म्हणजे अधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मारुती सुझुकी सीएनजी प्रकारात नवीन अल्टो लाँच करू शकते.