इलेक्ट्रिक कारच्या जगात आता होणार Ola ची एंट्री, खास प्लानबाबत जाणून घ्या
Ola Electric Car: ओला इलेक्ट्रिक कारची गेल्या काही महिन्यांपासून ग्राहक आतुरतेने वाट पाहात आहेत. गेल्या वर्षी कॉन्सेप्ट इमेजमध्ये फ्यूचरिस्टिक डिझाईनची झलक दाखवण्यात आली होती. तसेच ही गाडी इतर गाड्यांच्या तुलनेत स्वस्त असेल असंही सांगण्यात येत आहे.
मुंबई- ऑटोक्षेत्रात तंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून बरेच बदल झाले आहेत. एकापेक्षा एक सरस गाड्या ऑटो कंपन्यांनी लाँच केल्या आहेत. ऑटो कंपन्यांनी भविष्यातील स्पर्धा पाहता इलेक्ट्रिक वाहन निर्मितीकडे मोर्चा वळवला आहे. इंधनांची वाढत्या किमती पाहता ग्राहकांचा कल देखील इलेक्ट्रिक गाड्या खरेदीकडे आहे. आता या स्पर्धेत ओला देखील उतरणार आहे. नुकतंच इलेक्ट्रिक स्कूटर निर्मितीत ओलाने दमदारपणे आपली मोहोर उमटवली आहे. इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता कंपनी Ola Electric Mobility Pvt इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. यासाठी कंपनीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी जी आर अरुण कुमार यांनी ओलाच्या कारबाबत माहिती दिली आहे.2024 साली दुसऱ्या सहामाहीत इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कारची डिझाईन अखेरच्या टप्प्यात असल्याचं देखील कुमार यांनी सांगितलं आहे.
कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी जी आर अरुण कुमार यांनी पुढे सांगितलं की, कंपनीला आपल्या दुचाकीमध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा फायदा होईल.आम्ही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आधीच स्कूटर बनवत आहोत. त्यामुळे आम्ही सॉफ्टवेअर, सेफ्टी सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक्स, सेल्स, ड्राईव्ह ट्रेनमध्ये बरंच काही केले आहे. यामुळे कारचं 30 ते 40 टक्के काम पूर्ण झालं आहे. ओला इलेक्ट्रिक कारची कॉन्स्पेप्ट डिझाईन खूपच आकर्षक आहे. यात स्लीक एलईडी हेडलँप्स, स्लॉपी विंडशील्ड आणि स्पोर्टी अलॉय व्हील्ज पाहायला मिळत आहेत.
यापूर्वी 2022 मध्ये ओलाचे संस्थापक भाविश अग्रवाल यांनी पहिल्या इलेक्ट्रिक कारबाबत सुतोवाच केला होता. या गाडीची पहिली झलकही दाखवली होती. तसेच या गाडीची किंमत 50 हजार डॉलरपेक्षा कमी असेल, असंही त्यांनी सांगितलं होतं. दुसरीकडे, इलेक्ट्रिक कारमध्ये लिथियन आयन बॅटरीचा वापर केला जातो. ही बॅटरी आयात केली जात असल्याने गाड्यांच्या किमतीत मोठा फरक दिसून येतो. सरकारने आयात शुल्कात घट करण्याची घोषणा केल्याने त्यामुळे कारच्या किमतीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.
ओलाले इलेक्ट्रिक कार बाजारात इतर कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. इलेक्ट्रिक कार उत्पादनात टेस्ला, ह्युंदाई मोटर्स आणि टाटा पंच आघाडीवर आहे. तर नुकतंच मारुति सुझुकीनेही आपलं इलेक्ट्रिक वर्जन सादर केला आहे. त्यामुळे ओला कंपनीची प्रस्थापित कंपन्याशी स्पर्धा असेल.ओला इलेक्ट्रिक सध्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. कंपनीने ओला एस1 आणि ओला एस1 तसेच ओला एस1 एअर सारख्या इलेक्ट्रिक स्कूटर्स सादर केल्या आहेत.