Pod Taxi : देशात येथे धावणार अनोखी पॉड टॅक्सी, अबूधाबी आणि लंडनच्या धर्तीवरील सेवा
आपल्या देशातील प्रकल्पासाठी लंडन आणि अबूधाबी पॉड टॅक्सीच्या मॉडेलचा अभ्यास करण्यात आला आहे. या पॉड टॅक्सीची सेवा कुठे सुरु होणार आहे, ते पाहूया...
लखनऊ : लंडन आणि अबूधाबीच्या धर्तीवर आता आपल्या देशातही पॉड टॅक्सी सेवा ( Pod Taxi ) लवकरच सुरु होणार आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने नोएडा ( Noida ) शहरात पॉड टॅक्सीला मंजूरी दिली होती. या पॉड टॅक्सीचा वापर देशात प्रथमच उत्तर प्रदेशात ( Uattar Pradesh ) होणार आहे. 14.6 किमीच्या या कॉरीडॉरचा डीपीआर ( DPR ) देखील तयार करण्यात आला आहे. या योजनेसाठी 641.53 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च येणार आहे. दुहेरी ट्रॅकचा वापर असलेल्या पॉड टॅक्सीला तयार करण्यासाठी एक वर्षांचा कालावधी लागणार आहे.
उत्तर प्रदेशात तयार होत असलेल्या नवीन फिल्म सिटी ते जेवर एअरपोर्ट या मार्गावर पॉड टॅक्सीला मंजूरी देण्यात आली आहे. या पॉड टॅक्सीच्या 14.6 किमीच्या डबल ट्रॅकसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी लंडन आणि अबूधाबी पॉड टॅक्सीच्या मॉडेलचा अभ्यास करण्यात आला आहे. हा प्रकल्प मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल असे म्हटले जात आहे. पॉड टॅक्सीच्या बांधकामासाठी येत्या आठवड्यात जागतिक निविदा काढण्यात येणार आहे.
एका पॉड टॅक्सीत 12 जण बसणार
जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहचण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टला मजबूत करण्यासाठी पॉड टॅक्सी ही संकल्पना देशात प्रथमच राबविली जाणार आहे. ही संपूर्ण ड्रायव्हरलेस टॅक्सी असून लंडन आणि अबूधाबीनंतर युपीत तिचा प्रवेश होणार आहे. एअरपोर्ट ते फिल्म सिटी दरम्यान पर्सनल रॅपिड ट्रांझिट ( पीआरटी ) योजना चालविण्याची योजना आखली आहे. पॉड टॅक्सीचा डीपीआर तयार करण्याची जबाबदारी इंडीयन पोर्ट रेल अॅण्ड रोपवे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सी
देशातील पहिली पॉड टॅक्सी नोएडा एअरपोर्ट ते फिल्मसिटी धावणार आहे. या इंडीयन पोर्ट रेल अॅण्ड रोपवे कार्पोरेशन लिमिटेडने नोएडा एअरपोर्ट ते फिल्मसिटी पर्यंत 14 किमीचा मार्ग बांधला जाणार आहे. या मार्गावर एकूण 12 स्थानके असणार आहेत. या ड्रायव्हरलेस पॉड टॅक्सीत 12 प्रवाशांना बसण्याची सोय असणार आहे. या प्रोजेक्टचा डीपीआर यमुना प्राधिकरणाकडे सोपविण्यात आला आहे. यमुना एक्सप्रेस वे प्राधिकरणाचे सीईओ डॉक्टर अरूण वीर सिंह यांनी सांगितले की डीपीआरला आता यमुना एक्सप्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरणासमोर मंजूरी साठी पाठविले आहे. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.