टाटा नेक्सॉनसह टियागो ईव्ही झाली स्वस्त! 1.20 लाखांपर्यंत कमी झाल्या किंमती
Tata Electric Car | Tata Nexon EV आणि Tiago EV नुकतीच बाजारात उतरविण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये कंपनीने अनेक मोठे बदल केले आहेत. त्यामुळे या कारची मोठी चर्चा बाजारात उसळली आहे. Tata Motors ने आता वाढती स्पर्धा लक्षात घेत या इलेक्ट्रिक कारच्या किंमतीत मोठी कपात केली आहे.
नवी दिल्ली | 13 February 2024 : देशाची प्रमुख वाहन निर्मिती कंपनी टाटा मोटर्सने, इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये मोठी झेप घेतली आहे. इतर इलेक्ट्रिक कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किंमती घटवल्याने आता टाटा पण या स्पर्धेत उतरली आहे. त्याचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. कंपनीने त्यांची लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयुव्ही Nexon EV पासून ते त्यांची इलेक्ट्रिक हॅचबॅक Tiago EV च्या किंमतीत 1.20 लाख रुपयांच्या कपातीची घोषणा केली. जर तुम्हाला स्वस्तात इलेक्ट्रिक कार घ्यायची असेल तर ही तुमच्यासाठी नामी संधी आहे.
Nexon EV ची किंमत काय
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने ही माहिती शेअर केली आहे. त्यानुसर, त्यांची सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार Nexon EV ची किंमत 1.20 लाखांनी कमी झाली आहे. आता नेक्सॉनचे इलेक्ट्रिक व्हर्जन ग्राहकांना केवळ 14.49 लाख रुपयांत खरेदी करता येईल. Nexon EV चे लाँग रेंज व्हर्जन 16.99 लाख रुपयांच्या घरात आहे.
Tiago EV च्या किंमतीत कपात
टाटा मोटर्सनुसार, देशातील सर्वाधिक विक्री होणारी Tiago EV चे बेसिक मॉडेलमध्ये 70,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या कारची सुरुवातीची किंमत केवळ 7.99 लाख रुपये आहे. देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी ही कपात करण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. किंमतीत मोठी कपात झाल्याने ग्राहकांचा फायदा होणार आहे.
ही कपात कशी झाली शक्य?
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे विवेक श्रीवत्स यांनी यांनी ही कपात कशामुळे शक्य झाली याची माहिती दिली आहे. त्यानुसार, इलेक्ट्रिक वाहनाच्या किंमतीत बॅटरीसाठी मोठा खर्च होतो. पण गेल्या काही दिवसांपासून बॅटरी सेलच्या किंमतीत नरमाई दिसून आली. तर भविष्यात त्यामध्ये अजून मोठी कपात होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा आता ग्राहकांना होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही कपात हातभार लावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.