अमेरिकन इलेक्ट्रिक कार भारतीय रस्त्यावर, Tesla चे लवकरच उत्पादन
Tesla Elon Musk | टेस्लाची इलेक्ट्रिक कारची प्रतिक्षा अनेक दिवसांपासून सुरु आहे. भारतात येण्यासाठी टेस्लाने कंबर कसली आहे. सीईओ एलॉन मस्क यांनी त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पुण्यात कार्यालय सुरु करण्यासाठी करार पूर्ण झाला आहे. Tesla Inc सोबतच करार अंतिम स्वरुपात आला आहे.
नवी दिल्ली | 21 नोव्हेंबर 2023 : भारतीय ऑटो सेक्टर जलदगतीने इलेक्ट्रिफाईड होत आहे. भारतातील उभारत्या बाजारपेठेवर जगातील सर्वच दिग्गज कंपन्यांचे लक्ष आहे. पूर्वी भारतात येण्यासाठी नाकं मुरडणाऱ्या कंपन्यांना ‘मेड इन भारत’चा शिक्का मिरवायचा आहे. या रांगेत VinFast Auto सर्वात आघाडीवर आहे. तर त्यापूर्वीच तिची प्रतिस्पर्धी कंपनी Tesla Inc. भारतात मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. जूनपासून टेस्लाने अनेक पातळ्यावरील प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. टेस्लाचा भारतातील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एका वर्षाच्या आत भारतीय रस्त्यावर टेस्लाची इलेक्ट्रिक कार धावू शकते.
काय आहे दावा
ब्लूमबर्गने एक रिपोर्ट तयार केला आहे. त्यात अमेरिकन वाहन कंपनी टेस्लासोबतच करार पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुढील वर्षात कंपनीची इलेक्ट्रिक कार भारतीय रस्त्यावर धावण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या करारातंर्गत कंपनी दोन वर्षांच्या आत देशात फॅक्टरी उभारणार आहे. तर इलेक्ट्रिक कारची आयात करणार आहे. जानेवारी महिन्यात व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट होत आहे. त्यात याविषयीची अधिकृत घोषणा होऊ शकते.
बाजारपेठेला होईल फायदा
भारत सरकार कार उत्पादक कंपन्यांसाठी इको सिस्टिम तयार करत आहे. त्यातंर्गत कंपन्यांना लिखित हमी द्यावी लागेल. सुरुवातीच्या काळात 20 टक्के पार्ट्स स्थानिक बाजारातून तर चार वर्षानंतर 40 टक्क्यांहून अधिक पार्ट्स स्थानिक व्हेंडर्सकडून अथवा त्यांच्या स्थानिक उपकंपन्याकडून या कंपन्यांना खरेदी करावे लागतील. कंपन्यांना भारतात उत्पादन सुरु करावे लागणार आहे. बँक गॅरंटी ड्यूटी ब्रेक मूल्याइतके असेल.
मस्क लवकरच भारत दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकन दौऱ्यावर होते. त्यावेळी एलॉन मस्क यांनी त्यांची भेट घेतली. या मुलाखतीनंतर मस्क मोठे प्रभावित दिसून आले. त्याने तातडीने भारताला भेट देण्याची घोषणा केली. लवकरच एलॉन मस्क भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काय आहे योजना
टाईम्स ऑफ इंडियानुसार, टेस्ला भारतात जवळपास 5 लाख इलेक्ट्रिक कार तयार करण्याचे उद्दिष्ट घेऊन दाखल होईल. टेस्लाची इलेक्ट्रिक कार 20 लाख रुपयांपासून भारतात विक्री होईल. जर ही योजना पूर्ण झाली तर भारतीय इलेक्ट्रिक बाजारात तीव्र स्पर्धा असेल. ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा आणि फीचर्ससह कार उपलब्ध होतील.
पुण्यात थाटले कार्यालय
भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात टेस्लाचा लवकरच प्रवेश होईल. त्यापूर्वीच टेस्ला इंडिया मोटर अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड पुण्यात पंचशील बिझनेस पार्कमध्ये कार्यालय थाटणार आहे. त्यासाठी त्यांनी भाडे तत्वावर कार्यालय पण घेतले आहे. बी विंगच्या पहिल्या मजल्यावर हे कार्यालय आहे. हे कार्यालय 5,580 चौरस फुट इतके आहे. टेबलस्पेस टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटिडे सोबत त्यासाठी करार झाला आहे. भारतात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यात किंवा यापैकी एका ठिकाणी कंपनी कारखाना उभारु शकते.