Flex Fule : फ्लेक्स फ्युअल खरंच आणणार क्रांती? स्वस्तात करता येईल का प्रवास
Flex Fuel : इंधनात पण आत्मनिर्भर होता यावे यासाठी केंद्र सरकारने इंधनाचे पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. फ्लेक्स फ्युअल हा त्यातीलच एक प्रकार आहे. केंद्र सरकार ईव्ही नंतर आता या पर्यायी इंधनाला चालना देत आहे. कृषी प्रधान देशात इथेनॉल मोठ्या प्रमाणात उत्पादीत करता येत असल्याने त्याचा फायदा होऊ शकतो. इंधन स्वस्त मिळू शकते.
नवी दिल्ली | 30 ऑगस्ट 2023 : देशात सध्या आत्मनिर्भर भारताचे धोरण राबविण्यात येत आहे. अनेक क्षेत्रात भारताने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पेट्रोल-डिझेलचे मर्यादीत साठे पाहता, त्यावरील खर्च लक्षात घेता, केंद्र सरकार पारंपारिक इंधनाला पर्याय शोधत आहे.पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वस्त पर्यायावर भर देण्यात येत आहे. देशात ईलेक्ट्रिक व्हेईकलला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सोबतच हायड्रोजन आणि इतर पर्यायी इंधनासाठी चालना देत आहे. इथेनॉलवर आधारीत वाहनांसाठी प्रयत्न सुरु आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी 100 टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या कारचे मंगळवारी 23 ऑगस्ट 2023 रोजी लाँचिंग केले. टोयोटो इनोव्हा हायक्रॉस असं या कारचे नावं आहे. BS6 स्टेज-2 मानांकनानुसार ही कार तयार करण्यात आली आहे. ही जगातील पहिलीच इलेक्ट्रिफाईड फ्लेक्स फ्युएल कार (Electrified Flex fuel Car) आहे. केंद्र सरकार ईव्ही नंतर इतर पर्याय शोधत आहे. शेती प्रधान देशात इथेनॉल मोठ्या प्रमाणात उत्पादीत करता येत असल्याने त्याचा फायदा होऊ शकतो. इंधन स्वस्त मिळू शकते.
जगभरात फ्लेक्स इंधन लोकप्रिय
जगभरातील अनेक देशात फ्लेक्स इंधन लोकप्रिय आहे. ब्राझीलमधील 93 टक्के वाहनं यावर धावतात. भारतात पण पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे धोरण राबविण्यात येणार आहे. सध्या 10 टक्के इथेनॉलमध्ये मिक्स करण्यात येते. 2025 पर्यंत सर्वच वाहनात 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल मिळेल.
काय आहे Flex Fuel
फ्लेक्स फ्युअल हे खास प्रकारचे तंत्रज्ञान आहे. यामध्ये वाहनांमध्ये 20 टक्के इथेनॉल वापराची सुविधा देते. फ्लेक्स फ्युअल गॅसोलीन(पेट्रोल), मेथनॉल अथवा इथेनॉलचे मिश्रण यामध्ये असते. या वाहनाचे इंजिन विविध प्रकारच्या इंधनाचा वापर करण्यासाठी डिझाईन करण्यात येते.
हा प्रयोग नवीन नाही
जगात फ्लेक्स फ्युअलचा प्रयोग नवीन बिलकूल नाही. 1994 साली पहिल्यांदा फोर्डने ये तंत्रज्ञान वापरले. त्यानंतर जगभरातील अनेक देशात त्याचा वापर सुरु झाला. त्यामुळे प्रदूषणाची समस्या बरीच कमी झाली. पेट्रोल-डिझेलवरील निर्भरता कमी झाली. पर्यायाने देशाचा पैसा वाचला. एका रिपोर्टनुसार, 2017 पर्यंत जगातील रस्त्यांवर 21 दशलक्ष फ्लेक्स फ्युएल वाहनं होती.
काय होईल फायदा
इथेनॉलच्या वापराने प्रदुर्षण कमी होईल. पण पेट्रोलच्या किंमती कमी होतील, अशी अटकळ आहे. तसेच या वाहनामुळे प्रवास खर्च वाचण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेलची आयात कमी होईल. पर्यायाने देशाची गंगाजळी वाचेल. इंजिन काही दिवसांनी खराब होण्याची भीती काही तज्ज्ञ वर्तवत आहे, तेवढीच एक त्रुटी या इंधनाची असू शकते.
कसे होते इथेनॉल
स्टार्च आणि साखरेच्या किण्वातून इथेनॉल तयार करण्यात येते. हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे. पेट्रोलमध्ये मिसळून ते वापरण्यात येते. ऊसाच्या रसापासून, मका, बटाटे, कुजलेला भाजीपाला, स्टार्चयुक्त पदार्थातून इथेनॉल तयार करण्यात येते. कुजलेल्या पदार्थांपासून ते तयार करण्यात येते.
देशाला झाला इतक्या कोटींचा फायदा
सध्या 10 टक्के इथेनॉल मिसळून पेट्रोलची विक्री सुरु आहे. 2025 पर्यंत हे प्रमाण 20 टक्के करण्यात येईल. 10 टक्के इथेनॉल मिसळून पेट्रोल विक्री होत असल्याने 41,500 कोटी रुपयांहून अधिक परकीय चलन वाचविण्यात आले. तर 20% इथेनॉल मिश्रणासह पेट्रोलच्या पुरवठ्यामुळे वार्षिक 4 अब्ज डॉलर वाचण्याचा अंदाज आहे. हरित वायू उत्सर्जनात 27 लाख टनांनी घट झाली असून शेतकऱ्यांना 40,600 कोटींचा फायदा झाला आहे.