Budget 2023 : रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांच्या सवलतीचे काय होणार ? कोरोनाकाळात बंद केलेल्या या सवलतीबद्दल काहीच उल्लेख नसल्याने नाराजी
रेल्वेच्या प्रवास सवलतीवर 2019-20 मध्ये 59,837 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरीकांना प्रवासी सवलत पुन्हा बहाल होणार का ? या विषयी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव काय निर्णय घेतात याकडे नजर लागली आहे.
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाचे जनरल बजेट ( BUDGET ) सादर करताना रेल्वे अर्थसंकल्पाबद्दल केवळ एका ओळीत उल्लेख केला आहे. रेल्वेसाठी 2.40 लाख कोटीची तरतूद केल्याचे सितारामन यांनी म्हटले आहे. परंतू रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरीकांना ( senior citizens ) असलेल्या प्रवासातील सवलती विषयी बजेटमध्ये काहीही उल्लेख केला नसल्याने ही कोरोनाकाळात बंद केलेली ही सवलत पुन्हा कधी बहाल करण्यात येणार का ? असा सवाल ज्येष्ठ नागरीक करीत आहेत.
रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना ( senior citizens ) रेल्वे प्रवासात सवलत दिली जाते. कॅन्सर सारखे दुर्धर आजार, तसेच विद्यार्थी, अधिस्वीकृती पत्रकार आदी विविध वर्गवारीतील नागरीकांना रेल्वे प्रवासात सवलत देत असते. कोरोना साथ पसरल्याने मार्च 2021 टाळेबंदी जाहीर केल्यानंतर रेल्वेसह सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्यानंतर कोरोनाची साथ कमी झाल्यानंतर हे निर्बंध हळूहळू उठविण्यात आले. रेल्वेने आपली सेवा पूर्ववत केली असली तरी ज्येष्ठांसह अनेक कॅटगरीची सवलत अद्याप पूर्ववत केलेली नाही. त्यामुळे ही सवलत कधी बहाल होणार असा सवाल ज्येष्ठ नागरीक बळीराम राणे यांनी टीव्ही नाईन मराठीशी बोलताना केला आहे.
लवकरच ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा प्रवास सवलत मिळणार का
कोरोना काळात बंद केलेली ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवासाची सवलत सुरू करण्यास केंद्र सरकारने नकार दिला होता. त्यामुळे ज्येष्ठ नागरीक नाराज झाले आहेत. ही सिनियर सिटीझन सवलत पुन्हा सुरू होऊ शकते का ? या विषयी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) काय निर्णय घेतात याकडे नजर लागली आहे.
रेल्वे मंत्रालय लवकरच ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीसाठीचे पात्रता मापदंड बदलणार असल्याचे म्हटले जात होते. रेल्वे बोर्ड ज्येष्ठ नागरिकांना द्यावयाच्या सवलतीचे निकष बदलणार असल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. त्यात काही श्रेणीसाठी रेल्वे तिकिटात ही सवलत मिळणार असल्याचे म्हटले होते.
पूर्वी सर्व श्रेणीसाठी रेल्वे तिकिटात सवलत देण्यात येत होती. ज्येष्ठ नागरिकांना सवलत देण्याविषयीची योजना तयार करण्यात होत असल्याचे म्हटले जात होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना सरसकट न देता काही अटी घालण्यात येणार आहेत. पण अद्याप याविषयीचे नियम आणि शर्ती जाहीर करण्यात आलेल्या नसल्याचे म्हटले जात आहे.
रेल्वे मंत्रालयाने (Ministry Of Railways) दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना रेल्वेच्या भाड्यात 53 टक्के सवलत देण्यात येते. यासोबतच दिव्यांग, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी प्रवास भाड्यात सवलत देण्यात येते. रेल्वेमंत्री वैष्णव यांनी रेल्वे प्रवासावर सवलत मिळण्याबाबतच्या प्रश्नावर लोकसभेत ही माहिती दिली होती. रेल्वे तिकिटावर सवलत देण्यात येणार आहे. 2019-20 मध्ये रेल्वेच्या प्रवास सवलतीवर 59,837 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
कोरोनाकाळापूर्वी रेल्वे प्रवासात अशी मिळायची सवलत
कोरोना साथीपूर्वी रेल्वे 58 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या महिला आणि 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पुरुष प्रवाशांना प्रवासी सवलत देत होती. 22 मार्च 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत 37 लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आहे. रेल्वे प्रवास सवलतीसाठी महिलांचे पात्रता वय किमान वय 58 आहे, तर पुरुषांसाठी ते 60 आहे. पूर्वी 50% सवलत मिळायची नंतर 40% सवलत देण्यास सुरूवात झाली होती.
रेल्वे प्रवासी सेवेसाठी रेल्वे 59,000 कोटी रुपयांची सबसिडी देत आहे, जी अनेक राज्यांच्या वार्षिक बजेटपेक्षा मोठी आहे. त्याच वेळी, रेल्वेचे वार्षिक पेन्शन बिल सुमारे 60,000 कोटी रुपये आहे. याशिवाय पगाराचे बिल 97 हजार कोटी रुपये आहे, तर 40 हजार कोटी रुपये इंधनावर खर्च होत आहेत.