Budget 2024 : बिहारविषयीचा अंदाज ठरला खरा, या मागणीसाठी JDU ने लावली ताकद; सर्वपक्षीय बैठकीत काय घडल्या घडामोडी
JDU Bihar : केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजीत केली होती. या बैठकीत स्थानिक पक्षांनी राज्याच्या विकासावर भर दिला. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होत आहे. 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेट सादर करतील.
केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारने रविवारी सर्वपक्षीय बैठक आयोजीत केली होती. या बैठकीला विरोधी गोटातील काही घटक पक्षांनी दांडी मारली. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील आणि इतर पक्षांनी त्यांच्या राज्यासाठी मोठी मागणी केली. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बिगूल वाजणार आहे. 23 जुलै 2024 रोजीपासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेट सादर करतील. त्यापूर्वीच बिहारसह आंध्र प्रदेश आणि ओडिशातील पक्षांनी केंद्राकडे राज्यासाठी वकिली केली.
विशेष राज्याची केली मागणी
सर्वपक्षीय बैठकीनंतर काँग्रेसने आतील घडामोडींची माहिती दिली. काँग्रेस नेता जयराम रमेश यांनी याविषयीचे एक ट्वीट केले आहे. त्यानुसार, नितीश कुमार यांच्या जनता दल (संयुक्त), जेडीयूने बिहार राज्याला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. नितीश कुमार विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या काही दिवसांपासून आग्रही दिसले. त्यासोबतच ओडिसा आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्य घोषीत करण्यासाठी अनुक्रमे बिजू जनता दल आणि YSRCP ने मागणी नोंदवली. तर तेलगू देसमने कोणतीच मागणी न नोंदवल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
काँग्रेसने केली ही मागणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने या बैठकीत लोकसभेत उपाध्यक्ष पदावर दावा सांगितला. काँग्रेसने नीटचा मुद्दा उपस्थित केला. समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी कावड मार्गाची मागणी रेटली. तर YSRCP ने राज्यातील सुरक्षेचा मुद्दा पुढे केला. त्यांनी तेलगू देसम पक्षावर आरोप केले.
22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत बजेट सत्र
सर्वपक्षीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजनाथ सिंह होते. सोमवार 22 जुलैपासून बजेट सत्र सुरु होत आहे. हे सत्र 12 ऑगस्टपर्यंत सुरु असेल. 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या केंद्रीय बजेट सादर करतील. या अर्थसंकल्पीय सत्रात सरकार सहा विधेयक मांडण्याची शक्यता आहे. तर विरोधकांची काय मागणी आहे, याची चाचपणी या बैठकीतून सरकारने केली.
नितीश कुमार आणि चंद्रबाबू किंगमेकर
16 खासदारांसह तेलगू देसम पक्ष तर 12 खासदारांसह जनता दलाचे (संयुक्त) 12 खासदार राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला इच्छित आकडा गाठता आला नाही. त्यांना तिसऱ्यांदा सरकार स्थापन्यासाठी या दोन्ही पक्षांची मदत झाली. या आघाडी सरकारमध्ये आता घटक पक्षांची मर्जी सुद्धा भाजपला सांभाळावी लागणार आहे. यावेळी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार एनडीए सरकारमध्ये किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.