Budget 2024 : पीएम किसान योजनेच्या हप्त्यात होणार वाढ, शेतकऱ्यांना केंद्र सरकार गिफ्ट देणार?
PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेतंर्गत देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये तीन हप्त्यात मिळतात. डीबीटी माध्यमातून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. आता वार्षिक 8,000 रुपये हप्ता करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या जुलै महिन्याच्या अखेरच्या सत्रात पूर्ण बजेट सादर होईल. देशातील कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांनी पीएम किसान योजनेतील हप्त्यात वाढ करण्याविषी आग्रही मागणी केली. पीएम किसान योजनेतंर्गत सध्या 6,000 रुपये वार्षिक रक्कम मिळते. ही रक्कम 8,000 रुपये करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्यांनी बजेट 2024 मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीने देण्यासोबतच कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची आणि स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी इको सिस्टिम सुरु करण्याची विनंती केली आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्र सरकारने पीएम किसान योजना सुरु केली होती.
कुणाला होतो फायदा?
पीएम किसान योजना देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबाला वार्षिक 6,000 रुपये मिळतात. दर चार महिन्याला एक याप्रमाणे वर्षातून तीन हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात. देशभरातील 11 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना योजनेतंर्गत रक्कम देण्यात येते. आतापर्यंत 3.04 लाख कोटी रुपयांहून अधिकची रक्कम वाटप करण्यात आली आहे. आताच देण्यात आलेल्या हप्ता गृहित धरला तर एकूण वाटप करण्यात आलेली रक्कम 3.24 लाख कोटींपेक्षा अधिक होते.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांनी लागलीच पीएम किसान योजनेचा निधी वाटपावर स्वाक्षरी केली. या योजनेचा 17वा हप्ता नुकताच देण्यात आला. त्याचा देशभरातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला. यामध्ये जवळपास 20,000 कोटी रुपये देण्यात आले.
योजनेसाठी असा करा अर्ज
1. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर पीएम किसान पोर्टल https://pmkisan.gov.in/ वर भेट द्यावी लागेल. पोर्टल उघडताच तुम्हाला Farmer Corner मध्ये नवीन नाव नोंदणी हा पर्याय दिसेल.
2. आता आणखी एक नवीन पेज उघडेल. याठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती, तपशील नोंदवा. ही संपूर्ण माहिती दिल्यानंतर एक कॅप्चा कोड दिसेल. तो नोंदवा.
3. आता OTP बटणवर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी मिळेल. तो नोंदवा. ओटीपी नोंदविल्यानंतर अजून एक नवीन पेज उघडेल.
4. या नवीन पेजवर तुम्हाला विचारलेली इतर माहिती, तपशील नोंदवा. त्यानंतर अत्यावश्यक दस्तावेजची सॉफ्ट कॉपी अपलोड करा आणि ही माहिती सेव्ह करा. या प्रक्रियेनंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
हप्ता जमा झाला की नाही असे तपासा
1. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.
2. ई-केवायसी पूर्ण झाला असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तरच खात्यात पैसा येईल.
3. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकऱ्यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा.