Budget 2024 : करा बचतच बचत, सेव्हिंग अकाऊंटसाठी अर्थसंकल्पात खास गिफ्ट, काय होणार बदल
Saving Account : महागाईमुळे सर्वसामान्यांची बचत कमी झाली आहे. तर बचतीवर कर लागण्याची भीती पण सर्वसामान्यांना सतावते. पण आगामी बजेटमध्ये या बचतीवरील करासंबंधीची मोठी अपडेट समोर येऊ शकते. गुंतवणूकदारांना गिफ्ट मिळू शकते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या महिन्यात अर्थसंकल्प सादर करतील. बजेटमध्ये करदात्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. वृत्तानुसार, यामध्ये करदात्यांच्या बचत खात्यासंबंधीची एक महत्वपूर्ण घोषणा होऊ शकते. सरकार बचत खात्यावर बँकेकडून मिळणाऱ्या व्याजावरील कमाईवर जो कर लावण्यात येतो, त्यावर गिफ्ट देऊ शकते. काही अर्थतज्ज्ञांनी भारतात कमाई आणि खर्चावर पण मोठा कर लावल्याचा आरोप केल्यानंतर सरकार नागरिकांना दिलासा देण्यासाठी मोठे फेरबदल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बजटमध्ये होऊ शकते घोषणा
ईटीच्या रिपोर्टनुसार, बचत खात्यावरील व्याजातून होणाऱ्या कमाईवर कर सवलत मिळू शकते. व्याजातून होणाऱ्या 25 हजार रुपयांपर्यंतच्या कमाईवर बजटमध्ये डिडक्शनचा लाभ मिळू शकतो. सूत्रांच्या माहिती आधारे एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, याविषयीचा प्रस्ताव सरकारला प्राप्त झाला आहे. त्याचे अवलोकन करण्यात येत आहे. सरकार व्याजातून होणाऱ्या कमाईवरील कर सवलतीची मर्यादा वाढवू शकते.
बँकांनी दिला होता प्रस्ताव
गेल्या आठवड्यात अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बँकांच्या प्रतिनिधीसोबत एक बैठक झाली. त्यात बँकांच्या प्रतिनिधींनी महत्वाच्या विषयाला हात घातला. बचत खात्यावरील व्याजातून होणाऱ्या कमाईवर कराची मर्यादा वाढविण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे बचतीला प्रोत्साहन मिळेल, अशी त्यांना आशा आहे. याविषयीची घोषणा अर्थसंकल्पात होईल.
करदाते आणि बँक या दोघांना फायदा
जर बजेटमध्ये सर्वसामान्यांना कर सवलत देण्यात आली तर करदाते आणि बँकांना त्याचा फायदा होईल. आज करदात्यांकडे कोणत्या ना कोणत्या बँकेत बचत खाते आहेच. या बचतीवर बँका करदात्यांना व्याजाच्या रुपाने परतावा देतात. पण हे व्याजाचे प्रमाण कमी असते. जर कराची मर्यादा वाढली तर बचत खात्यात बचत वाढले. त्यामुळे बँकेकडे ठेवी वाढतील, गंगाजळी वाढेल.
सध्या किती मिळते कर सवलत
आयकर खात्याच्या नियमानुसार बचत खात्यावरील व्याजाच्या कमाईवर करदात्यांना एक मर्यादीत सवलत मिळते. आयकर अधिनियमाच्या कलम 80 टीटीए अंतर्गत 10 हजार रुपयांपर्यंतच्या कमाईवर कर सवलत मिळते. तर 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही कर सवलत मर्यादा 50 हजार रुपये इतकी आहे. यामध्ये 80 टीटीबी अंतर्गत एफडीवरील व्याजातून होणाऱ्या कमाईचा सहभाग आहे.