Budget 2024 | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट भाषणाला किती वेळ घेतला?, सर्वात जास्त मोठे बजेटचे भाषण कोणाचे ?
संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावेळी त्यांनी केलेल्या भाषणाची वेळ यंदा आणखी कमी झाली आहे. अर्थसंकल्प सादर करताना सर्वात अधिक वेळ भाषण करण्याचा रेकॉर्ड नेमका कोणाच्या नावावर आहे. तर चला पाहूयात ?
नवी दिल्ली | 1 फेब्रुवारी 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत आर्थिक वर्षे 2024-25 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या गेल्या. अर्थमंत्री कोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष होते. शिवाय लोकांची नजर त्या बजेटचे भाषण किती वेळ करणार याकडेही लक्ष होते. कारण सीतारामन यांच्या नावावर आतापर्यंतचे सर्वात मोठे बजेट भाषण करण्याचा रेकॉर्ड आहे. साल 2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वात मोठे बजेट भाषण दिले होते. ते एका बॉलीवूड चित्रपटापेक्षाही मोठे होते. त्यांनी लोकसभेत 2.42 तासांचे बजेट भाषण केले होते. परंतू त्यानंतर मात्र त्यांच्या भाषणाचा कालावधी घटत गेला आहे. परंतू त्यांचा साल 2020 चा रेकॉर्ड अजूनही तुटलेला नाही. मोदी सरकारचे अंतरिम बजेट 2024 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अवघ्या 60 मिनिटांत आपले भाषण पूर्ण केले आहे.
गेल्यावर्षी इतक्या तासांत भाषण पूर्ण केले
गेल्यावर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. या सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या भाषणाचा वेळ 1 तास 25 मिनिटे होता. तर आर्थिक वर्षे 2022-23 चे बजेट सादर करताना त्यांना 1 तास 31 मिनिटांचा कालावधी लागला होता. तर साल 2019 मध्ये त्यांनी बजेट सादर करताना 2 तास 17 मिनिटे घेतली होती. निर्मला सीतारामन यांनी साल 2020 मध्ये माजी अर्थमंत्री जसवंत सिंह यांच्या साल 2003 च्या भाषणाचा रेकॉर्ड तोडत 2 तास 42 मिनिटांचे सर्वात मोठे बजेट भाषण केले होते.
जसवंत सिंह यांनीही केला होता रेकॉर्ड
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या आधी जसवंत सिंह यांच्या नावावर सर्वात मोठे बजेट भाषण देण्याचा रेकॉर्ड होता. साल 2003 मध्ये तत्कालिन अर्थमंत्री जसवंत सिंह यांनी 2 तास 13 मिनिटांचे प्रदीर्घ भाषण केले होते. जसवंत सिंह यांचा हा एक प्रकारचा रेकॉर्ड होता. हा रेकॉर्ड साल 2020 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तोडला.
सर्वात जास्त वेळ बजेट कोणी सादर केले ?
सर्वात जादा वेळा बजेट सादर करण्याचा रेकॉर्ड मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी आतापर्यंत सर्वात जास्त वेळा अर्थमंत्री म्हणून संसदेत तब्बल दहा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात आठ संपूर्ण अर्थसंकल्प आणि दोन अंतरिम अर्थसंकल्पाचा समावेश आहे. मोरारजी देसाई यांच्या नंतर युपीए सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून पी.चिदंबरम यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. याशिवाय प्रणव मुखर्जी आणि यशवंत सिन्हा यांनी 8-8 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देखील सहा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.