नवी दिल्ली | 1 फेब्रुवारी 2024 : कर्नाटकला केंद्राकडून पुरेसा निधी मिळत नाही. त्यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही असे सांगत संसदेत एका खासदाराने वेगळा वाद निर्माण केला आहे. अर्थसंकल्पाबाबत दक्षिण भारतावर अन्याय होत आहे. जो पैसा दक्षिण भारतात पोहोचायला हवा होता. तो वळवून उत्तर भारतात वितरित केला जात आहे असा आरोपही या खासदाराने केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाला उत्तर देताना कॉंग्रेस खासदार डीके सुरेश यांनी हा आरोप केला आहे.
हिंदी पट्टय़ाने दक्षिण भारतावर लादलेल्या अटींमुळे वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे दक्षिण भारतासाठी वेगळ्या देशाची मागणी करण्याशिवाय पर्याय नाही. कर्नाटकला केंद्राकडून पुरेसा निधी मिळत नाही, असा आरोप काँग्रेस खासदार डीके सुरेश यांनी केला.
खासदार डीके सुरेश यांच्या या आरोपावर प्रतिक्रिया देताना भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी कॉंग्रेसवरच टीका केली. काँग्रेस पक्षाचा इतिहास ‘फोडा आणि राज्य करा’ असा राहिला आहे. पण, त्यांचे खासदार डीके सुरेश पुन्हा तीच खेळी खेळत आहेत. त्यांना देशाचे उत्तर आणि दक्षिण असे विभाजन करायचे आहे अशी टीका केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये कर्नाटकला देण्यात आलेल्या कराचा वाटा वाढला आहे. एकीकडे त्यांचे नेते राहुल गांधी त्यांच्या ‘जोडो’ यात्रेद्वारे देशाला ‘एकत्र’ करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे देश तोडण्यासाठी वाकलेला खासदार आपल्याकडे आहे. ‘फूट पाडा आणि राज्य करा’ हा काँग्रेसचा विचार आहे, असे खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले.
वसाहतवाद्यांनी स्वीकारलेल्या परिस्थितीपेक्षा ही वाईट विचारसरणी आहे. कन्नड जनता असे कधीही होऊ देणार नाही. लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांना चोख प्रत्युत्तर देऊ आणि काँग्रेसमुक्त भारताची मोहीम यशस्वी होईल याची काळजी घेऊ, असा टोलाही सूर्या यांनी लगावला.