Budget 2023 : कुंभनगरीला अर्थसंकल्प भरभरून देणार? आगामी काळातील कुंभमेळ्यासाठी अर्थसंकल्प साधू-महंतांना खुश करणार?
नाशिक महानगर पालिकेच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कुंभाची तयारी सुरू करण्यात आली आहे. कुंभासाठी साधू-महंतांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच शहराचा विकास डोळ्यासमोर ठेऊन तरतूद होऊ शकते.
नाशिक : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसहित देशवासीयांना खुश करण्याचा प्रयत्न असणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) हा अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामध्ये जागतिक मंदीची चिंता समोर असतांना हा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने संपूर्ण देशाचे यामध्ये लक्ष लागून आहे. शेतकरी, नोकरदार, उद्योजक यांच्यासह विविध घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार असला तरी आगामी काळात नाशिक येथे कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन राजकारण करणारं सरकार असल्याने साधू-महंतांना खुश करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये 2026 मध्ये कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी साधूग्रामसह विविध ठिकाणी कायमस्वरूपी जागा खरेदीसाठी महानगरपालिका आग्रही आहे. त्याकरिता शासनाला प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देखील मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे.
कुंभमेळ्यासाठी जगभरातून साधू-संत नाशिक नगरीत दाखल होत असतात. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी खास उपाययोजना केल्या जातात.
नाशिक महानगर पालिकेच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तयारी सुरू करण्यात आली आहे. कुंभासाठी साधू-महंतांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच शहराचा विकास डोळ्यासमोर ठेऊन तरतूद होऊ शकते.
यामध्ये नाशिकच्या रामकुंड परिसरात केंद्र सरकारच्या माध्यमातून सुशोभीकरण, गोदावरी नदी स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर एखादा प्रकल्प जाहीर करण्यासाठी तरतूद केली जाऊ शकते.
गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदी स्वच्छतेसाठी नागरिक मागणी करत आहे, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गोदाकिनारी विविध प्रकल्प राबविले जात आहे. त्या दृष्टीने आणखी निधी देऊन वाढीव काम केले जाऊ शकते.
कुंभ काळात साधू महंत यांच्या करिता आरक्षित जागा कायमस्वरूपी शासनाचा ताब्यात घेण्यासाठी जमीन अधिग्रहीत करण्यासाठी निधी जाहीर करून साधू महंतांची मोठी अडचण दूर केली जाऊ शकते.
भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा नेहमीच हाती घेतला जातो. त्यावर भाजपकडून नेहमी राजकारण करतांना बोललंही जातं त्यामुळे साधू-महंत यांनाही यामध्ये नवीन काही देऊन खुश केलं जाऊ शकतं.
नाशिकमध्ये होऊ घातलेला कुंभ, आगामी काळातील निवडणुका आणि मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प बघता नाशिकमधील कुंभमेळ्याला अर्थसंकल्प काहीतरी देऊन जाईल अशी अपेक्षा नाशिककरांना आहे.
नाशिक महानगर पालिकेत भाजपची सत्ता होती, आता प्रशासक आहे. राज्यातही शिंदे-फडणवीस सरकार आहे. त्यामुळे कुंभनगरीला या अर्थसंकल्पात खास काही मिळेल अशी अपेक्षा साधू-महंतांना आहे.
बजेट 2023 साठी खालील लिंकवर क्लिक करा
Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा