Union Budget 2023 : बाजाराचा बजेटवर भरोसा हाय काय? शेअर मार्केटमधील पडझडीला ब्रेक लागेल का
Union Budget 2023 : शेअर बाजारातील पडझडीने नवीन वर्षात गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले, बजेटमध्ये काही रामबाण उपाय असेल काय
नवी दिल्ली : नवीन वर्षात शेअर बाजाराने (Share Market) न्यारे रंग दाखविले. बाजारात पडझडीच्या सत्राने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. अगदी बजेटच्या तोंडावर शेअर बाजारात ब्लॅक फ्रायडेने (Black Friday) गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळविले. केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget 2023-24) बाजाराची पडझड थांबण्यासाठी सरकार रामबाण उपाय शोधून काढेल, असा आशावाद गुंतवणूकदारांना वाटत आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी (FPI) बजेटपूर्वीच भारतीय शेअर बाजारातून काढता पाय घेतल्याने चिंता वाढली आहे. गुंतवणूकदारांचा बाजारावर अथवा सरकारच्या धोरणांवर भरोसा नाय काय? असा सवाल आता विचारल्या जात आहे. त्यामुळे दोन दिवसानंतर सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात बाजारासाठी भरीव तरतूदीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
भारतीय अर्थसंकल्पातील तरतुदी, निर्णय आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेच्या धोरणांचा परिणाम शेअर बाजाराची दिशा ठरवतील, असे तज्ज्ञांना वाटते. सध्याचे तिमाही निकाल, जागतिक बाजारातील संकेत, स्थानिक स्तरावरील महागाईचे आकडे, वाहन विक्रीची मासिक आकडेवारी या सर्वांचा परिणाम बाजारावर दिसून येईल.
या सर्व घडामोडींचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम दिसून येईल. पण महागाई आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारचे धोरण, विकास दर गाठण्यासाठीच्या तरतूदी आणि इतर उपाय यासंबंधी 1 फेब्रुवारी 2023 रोजीच्या बजेटमध्ये काय उपाय योजना करण्यात येतात, यावर बाजाराची दिशा ठरेल असे स्वस्तिका इन्वेस्टमार्ट लिमिटेडचे संतोष मीणा यांना वाटते.
अनेक कंपन्या चालु आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीच्या कमाईचे आकडे घोषीत करणार आहेत. तर वाहनांच्या मासिक विक्रीचे आकडेही याच आठवड्यात समोर येतील. तज्ज्ञांच्या मते या घडामोडींसह अदानी समूहावर सर्वांच्या नजरा असतील. हिंडनबर्ग अहवालानंतर अदानींच्या शेअरवर मोठा परिणाम झाला आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या (FPI) भूमिकेने चिंता वाढवली असली तरी अर्थसंकल्पात दिलासादायक तरतूदी झाल्यास, परदेशी पाहुणे पुन्हा भारतीय बाजाराकडे वळतील. त्यांना आशावादी चित्र दिसल्यास ते पुन्हा शेअर बाजारात पैसा ओतील, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
सेवा क्षेत्र आणि पूनर्निर्माण संबंधीची आकडेवारी पण याच आठवड्यात हाती येईल. हे आकडे बुधवार आणि शुक्रवारी जाहीर होतील. सॅमको सिक्युरिटीजचे प्रमख संशोधक अपूर्व सेठ यांच्या मते, बजेट आणि इतर घडामोडी पाहता हा संपूर्ण आठवडा अत्यंत महत्वाचा राहणार आहे. कंपन्यांचे तिमाही निकाल हाती आल्याने त्याचा शेअर बाजाराच्या तेजीवर परिणाम दिसून येईल.
या जानेवारी महिन्यात परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) शेअर बाजारातून 17,000 कोटी रुपये काढले आहेत. चीनच्या शेअर बाजाराचं आकर्षण, भारतीय अर्थसंकल्पाविषयीचे ठोकताळे आणि अमेरिकने केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हच्या धोरणाविषयी सतर्कतेमुळे त्यांनी हा पाऊल टाकले आहे.
27 जानेवारीपर्यंत एफपीआयने बाजारातून 17,023 कोटी रुपयांची विक्री केली आहे. अर्थात शेअर बाजारातून पैसा काढून घेतला आहे. या महिन्यात एफपीआयाने कर्ज आणि बॉंडमध्ये 3,685 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे अजित मिश्रा यांच्यामते केवळ अर्थसंकल्प म्हणूनच नाही तर अर्थव्यवस्थेसाठी पण हा आठवडा महत्वपूर्ण असेल .
या आठवड्यात लार्सन अँड टुब्रो, एससी, सनफार्मा, एचडीएफसी, आयटीसी आणि एसबीआय सारख्या अनेक प्रमुख कंपन्यांचे तिमाही निकाल समोर येतील. गेल्या आठवड्यात बीएसईच्या 30 शेअर असलेल्या सेन्सेक्सला 1,290.87 अंक वा 2.12 टक्क्यांचे नुकसान झाले आहे.