वेगवेगळ्या ठिकाणी जमा 70 हजार कोटी रुपयांना कुणीही वाली नाही
मुंबई : भारतातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये तब्बल 70 हजार कोटी रुपये बेवारस पडलेले आहेत. या रकमेवर कुणीही दावा केलेला नाही. ही रक्कम देशातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये जमा आहे. हे पैसे, शेअर विकत घेणे किंवा बँकेत, पोस्ट ऑफिसमधील योजनांमध्ये तसेच, विम्यासाठी गुंतवलेले आहेत. गुंतवणूक केल्यानंतर लोक विसरुन गेले, त्यामुळे तब्बल 70 हजार कोटी रुपये असेच बेवारस पडलेले आहेत. […]
मुंबई : भारतातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये तब्बल 70 हजार कोटी रुपये बेवारस पडलेले आहेत. या रकमेवर कुणीही दावा केलेला नाही. ही रक्कम देशातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये जमा आहे. हे पैसे, शेअर विकत घेणे किंवा बँकेत, पोस्ट ऑफिसमधील योजनांमध्ये तसेच, विम्यासाठी गुंतवलेले आहेत. गुंतवणूक केल्यानंतर लोक विसरुन गेले, त्यामुळे तब्बल 70 हजार कोटी रुपये असेच बेवारस पडलेले आहेत. त्याशिवाय, अनेकांनी पैसे गुतवण्यास सुरुवात केली, पण मॅच्युरिटीपर्यंत ते पैसे भरु शकले नाहीत. काही लोकांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या कुटुंबाला विम्याबाबत माहितीच नाही. त्यामुळे हे पैसे तसेच पडून आहेत. अशा प्रकारे देशातील अनेक संस्थामध्ये जमा असलेल्या या पैशांना कुणीही वाली नाही.
एकाच कंपनीत 1,500 कोटी
पीअरसेल जनरल फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये लोक पैसे जमा करुन विसरुन गेले. 15 वर्षात त्यांनी केलेली गुंतवणूक आज 1 हजार 541 कोटी रुपये इतकी झाली आहे. 15 वर्षांपूर्वी या कंपनीने लहान गुंतवणूकदारांना ठेव प्रमाण पत्र देत 1.49 कोटी रुपये जमवले होते. तेव्हा 51 टक्क्यांपोक्षा जास्त ठेव ही दोन हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी रकमेची होती. त्यानंतर लोक हे पैसे विसरुन गेले. त्यामुळे आता या कंपनीमध्ये 1 हजार 541 कोटी रुपये बेवारस पडलेले आहेत. ही रक्कम सरकारच्या इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (IEPF) मध्ये टाकण्यात येणार असल्याची माहिती सरकारने दिली.
IEPF मध्ये 25 हजार कोटी
IEPF मध्ये गेल्या सात वर्षात बेवारस कंपन्यांचे लाभांश आणि शेअर ट्रान्सफर करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 4 हजार 138 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. त्याशिवाय, कंपन्यांनी 21 हजार 232.15 कोटी रुपयांचे 65.02 कोटी शेअर्सही जमा केले आहेत.
विम्याचे 16 हजार कोटी रुपये
24 विमा कंपन्यांकडे विमाधारकांचे 16 हजार कोटी रुपये बेवारस पडले आहेत. याचा 70 टक्के भाग म्हणजेच 10 हजार 509 कोटी रुपये हे भारतीय जीवन विमा निगमच्या ग्रहकांचे आहेत. तर 24 गैर जीवन विमा कंपन्यांकडे 848 कोटी रुपये बेवारस आहेत.
बँकांकडे 20 हजार कोटी रुपये बेवारस
भारतीय रिझर्व्ह बँकेचं डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड (DEA Fund) हे 10 वर्षांपर्यंत कुणीही दावा न केलेल्या बँक खात्यांचा ताबा घेतला जातो. जून 2018 पर्यंत अशा बेवारस खात्यातून आरबीआयच्या डीइए फंडने 19 हजार 567 रुपये मिळवले.
पोस्ट ऑफिसमध्ये 9 हजार कोटी रुपये
देशात अनेक पोस्ट ऑफिस आहेत. या पोस्ट ऑफिसमध्ये जमा असलेल्या एकूण 9 हजार 395 कोटी रुपयांवर अद्याप कुणीही दावा केलेला नाही. लोकांनी पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये पैसे गुंतवले, पण मॅच्युरिटीनंतर कुणी दावाच केला नाही. तर काही लोकांनी पोस्टाच्या योजनांमध्ये पैसे जमा करण्यास सुरुवात केली, मात्र काही काळाने ते पैसे भरु शकले नाहीत. त्यामुळे सध्या भारतीय पोस्टाकडे 9 हजार 395 कोटी रुपये बेवारस आहेत.
देशातील या वेगवेगळ्या संस्थामध्ये एकूण 70 हजार कोटी रुपये बेवारस रक्कम जमा आहे. जर तुम्हीही अशा प्रकारे कुठल्या योजनेत किंवा संस्थेत पैसे गुंतवून विसरले असाल तर ते काढून घ्या. तुम्ही पैशांवर दावा करुन तुमचे पैसे परत मिळवू शकता.