नवी दिल्ली: गेल्या बऱ्याच काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा असलेला वाढीव महागाई भत्ता अखेर सप्टेंबरपासून प्रत्यक्षात हातात पडणार आहे. मात्र, या पगारवाढीपासून रेल्वे कर्मचारी आणि केंद्रीय सुरक्षादलांचे कर्मचारी तुर्तास वंचित राहणार आहेत. या दोन्ही विभागांसाठी संबंधित मंत्रालयाकडून स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. त्यानंतरच या दोन विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता लागू होईल.
केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा दर 1 जुलैपासून 11 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता तो 17 टक्के होता जो वाढून 28 टक्के झाला आहे. अर्थ मंत्रालयांतर्गत खर्च विभागाच्या कार्यालयीन निवेदनात असे म्हटले आहे की, 1 जुलैपासून कर्मचार्यांना महागाई भत्त्याचा दर मूलभूत वेतनाच्या 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात आला आहे. 1 जुलैपासून 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश अर्थ मंत्रालयाने दिलेत. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबरच्या वेतनात वाढीव भत्ते आणि थकबाकीची रक्कम मिळेल.
महागाई भत्त्यासंदर्भातील वाढीच्या घोषणेनंतर केंद्र सरकारनेही घरभाडे भत्ता (HRA) मध्ये 27 टक्के वाढ केली. वस्तुतः खर्च विभागाने 7 जुलै 2017 रोजी एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की जेव्हा महागाई भत्ता 25 टक्के ओलांडेल तेव्हा घरभाडे भत्ता सुधारित केला जाईल. 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत वाढला, त्यामुळे घरभाडे भत्ताही सुधारित करण्यात आला.
पुनरावृत्तीनंतर “X” श्रेणी शहरांसाठी एचआरए मूलभूत वेतनाच्या 27% असेल. त्याचप्रमाणे, “Y” वर्गातील शहरांसाठी ते मूलभूत वेतनाच्या 18 टक्के आणि “Z” श्रेणी शहरांसाठी हे मूलभूत वेतनाच्या 9 टक्के असेल. सध्या तिन्ही वर्गासाठी हे 24 टक्के, 16 टक्के आणि 8 टक्के आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी घरभाडे भत्ता 1-3 टक्क्यांनी वाढविण्यात आलाय.
याशिवाय महागाई भत्त्यातील वाढीचा थेट परिणाम वाहतुकीच्या भत्त्यावरही होईल आणि त्यातही वाढ झाली आहे. परिवहन भत्ता टीपीटीए प्रवर्गाच्या आधारे उपलब्ध आहे. दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, गाझियाबाद, बृहत्तर मुंबई, हैदराबाद, जयपूर, पटना अशी शहरे उच्च टीपीटीए प्रकारात येतात. याखेरीज उर्वरित शहरे इतर शहरांत येतात. टीपीटीए कर्मचार्यांच्या विविध स्तरांसाठी निश्चित केले गेले आहेत, ज्यावर महागाई भत्ता जोडून कर्मचार्यांना परिवहन भत्ता मोजला जातो.
संबंधित बातम्या
Pension Fundच्या नियमांत मोठा बदल, आता पेन्शनच्या पैशांची गुंतवणूक IPO आणि स्टॉक मार्केटमध्ये होणार
‘या’ कंपनीनं गुंतवणूकदारांचे भविष्यच बदलले, वर्षभरात 1 लाखांचे करून दिले 5 लाख