Insurance : कसा विकणार आता 1 रुपयांत कोट्यवधींचा विमा!
Insurance : विमा कंपन्यांना आता धुळफेक करता येणार नाही. त्यांना ग्राहकांना आमिष दाखवून फसवणूक करता येणार नाही. आता 1 रुपयांत कोट्यवधींचा विमा तर त्यांना विकताच येणार नाही.
नवी दिल्ली : विमा कंपन्यांना (Insurance Company) आता धुळफेक करता येणार नाही. त्यांना ग्राहकांना आमिष दाखवून फसवणूक करता येणार नाही. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) याविषयीचे नियम अधिक कडक करण्याची तयारी सुरु केली आहे. अनेक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भ्रामक जाहिराती (Misleading Advertisement) करतात. खोटेनाटे दावे करुन, भपकेबाज जाहिराती करुन ग्राहकांना विमा घेण्यासाठी भाग पाडतात आणि त्यांची फसवणूक करतात. ईरडा आता अशा विमा कंपन्यांविरोधात कडक कारवाई करणार आहे. अशा कंपन्यांना आता 1 रुपयांत कोट्यवधींचा विमा तर त्यांना विकताच येणार नाही.
नियमात दुरुस्ती विमा जाहिरात दुरुस्ती नियमन 2021 मध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या दुरुस्तीनुसार, विमा कंपनीला कमीत कमी तीन सदस्यांची एक जाहिरात समिती गठित करावी लागणार आहे. या समितीच्या सदस्यांवर नियमांचे पालन करण्याची जबाबदारी असेल. हे सदस्य विपणन, विमा आणि नियमांवर लक्ष ठेवतील. याविषयी ईरडाने विमा कंपन्यांकडून 25 मेपर्यंत सूचना आणि हरकती मागितल्या आहेत.
समिती उत्तरदायी या प्रस्तावानुसार, विमा कंपनीने स्थापन केलेली जाहिरात समिती उत्पादन नियमन समितीला बांधील असेल. उत्पादन नियमन समितीला जाहिरातीसंबंधी आक्षेप असेल तर अगोदर कंपनीच्या जाहिरात समितीला जबाबदार धरण्यात येईल. ही समिती उत्तरदायी असेल. या जाहिरातीविषयी निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उत्पादन नियमन समितीकडे असतील. ही समिती जाहिरातीला मंजुरी द्यायची की नाही, हे ठरवतील.
विमा कंपन्यांना लगाम रेकॉर्ड रिटेंशन पॉलिसी अंतर्गत विमा कंपन्यांना त्यांच्या जाहिरातीसंबंधीचे तीन वर्षांतील सर्व रेकॉर्ड सांभाळून ठेवावे लागतील. कमीत कमी तीन वर्षांतील जाहिरातांची सर्व माहिती कंपन्यांना ठेवावी लागेल. तसेच विमा कंपन्यांना जाहिरात त्यांच्या वेबसाईटवर अपलोड करण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी असेल. जाहिरात तपासूनच त्यांना अपलोड करावी लागेल.
सायबर सुरक्षा इरडाने विमा कंपन्यांना सूचना आणि सायबर सुरक्षेचे निर्देश दिले आहेत. कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर कोणतीही गोपनीय माहिती शेअर करु नये, व्यक्तिगत पोस्ट करु नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्य विमा महाग आरोग्य विम्यात आता महागाईची लाट आली आहे. वर्ष 2021 पेक्षा यंदा 2023 मध्ये ग्राहकांना आरोग्य विमा खरेदीसाठी अधिक रक्कम द्यावी लागेल. दोन वर्षात प्रीमियममध्ये जवळपास 14 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. नुतनीकरण आणि नवीन पॉलिसी खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशावर ताण पडेल. महागाई दर सातत्याने वाढत आहे. 2021 वैद्यकीय महागाई दर 14 टक्के होता, आशियाई देशांमध्ये हा खर्च सर्वाधिक आहे. त्यात या दोन वर्षांत आणखी भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य विम्यावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.