काही दिवसात बंद होणार ‘ही’ बँक, तुमचे खाते असेल तर पैसे ट्रान्सफर करुन घ्या
आदित्य बिर्ला कंपनीद्वारे सुरु असलेली आयडिया पेमेंट बँक (Idea payment bank close) लवकरच बंद होणार आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकने (आरबीआय) दिली.
मुंबई : आदित्य बिर्ला ग्रुपद्वारे सुरु असलेली ऑनलाईन पेमेंट बँक अर्थात आयडिया पेमेंट बँक (Idea payment bank close) लवकरच बंद होणार आहे, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिली. आदित्य बिर्ला स्वेच्छेने हा व्यवसाय बंद करत असल्याचेही आरबीआयने म्हटलं आहे. त्यामुळे ज्यांचे या ऑनलाईन बँकेत (Idea payment bank close) खाते असेल त्यांनी तातडीने आपले पैसे ट्रान्सफर करुन घ्यावे, असंही सांगण्यात आलं आहे.
आदित्य बिर्लाच्या ऑनलाईन आयडिया पेमेंट्स बँकेने स्वेच्छेने व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने डेलॉयट टूश तोमात्सू इंडिया एलएलपीच्या वरिष्ठ संचालक विजयकुमार व्ही. अय्यर यांची भागदारक म्हणून नियुक्त केली, असं आरबीआयने काल (18 नोव्हेंबर) सांगितले.
आदित्य बिर्लाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरुनही www.adityabirla.bank बँक व्यवसाय बंद करत असल्याची सूचना जाहीर केली आहे. त्यासोबतच खाते धारकांना चिंता न करण्याचे आव्हानही बँकेने केले आहे.
“आम्ही तुम्हाला विश्वास देतो की, खाते धारकांचे बँकेत जमा असलेले सर्व पैसे सुखरुप त्यांना व्यवस्थित दिले जातील. याची पूर्ण व्यवस्था बँकेने केली आहे”, असं बँकेने सांगितले.
दरम्यान, आयडिया सेल्युलर यांनी एप्रिल 2016 मध्ये सब्सिडिअरी आयडिया मोबाईल कॉमर्स सर्व्हिसेसला ऑनलाईन पेमेंट बँकेत मर्ज केले होते. या ऑनलाईन पेमेंट बँकेला आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट बँक, असं नाव दिले होते. आता ही पेमेंट बँक बंद झाल्यानंतर एअरटेल, पेटीएम, जिओ इंडिया पोस्टसारख्या प्रमुख कंपन्याकडून पेमेंट बँक सेवा उपलब्ध राहिल.