नवी दिल्ली : अचानक सर्व ग्रह वक्री फिरल्याने अदानी समूहाला मोठा निर्णय घ्यावा लागला. अगदी काही दिवसांपूर्वी प्रगतीच्या लाटेवर स्वार झालेल्या या समूहाचे तारे सध्या ‘गर्दिश’मध्ये आहेत. गुंतवणूकदारांचा विश्वास डामाडोल होऊ नये यासाठी समूहाने मोठा निर्णय घेतला आहे. अदानी समूहाने बाजारात दाखल केलेला एफपीओ अखेर रद्द केला. बाजारातील चढउतार बघता, अदानी एंटरप्राईजच्या (Adani Enterprises) संचालक मंडळाने एफपीओ (FPO) रद्द करण्याचा निर्णय घेतला. याविषयीची माहिती चेअरमन गौतम अदानी (Gautam Adani) यांनी दिली. शेअर बाजारातील (Share Market) वेगाने होत असलेल्या घडामोडी, बाजारातील चढउतार याचा गुंतवणूकदारांवर परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. गुंतवणूकदारांचे हितरक्षण करणे महत्वाचे असल्याचे अदानी यांनी स्पष्ट केले. गुंतवणूकदारांनी (Investors) अदानी एंटरप्राईजेसच्या एफपीओमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. ही रक्कम त्यांना परत करण्यात येणार आहे. हा व्यवहार पूर्ण करण्यात येणार असल्याचे समूहाने स्पष्ट केले.
अदानी समूहाची फॉलो ऑन पब्लिक ऑफर काय होती? बाजारातून मोठी रक्कम जमा करण्यासाठी कंपनीने हा एफपीओ बाजारात उतरवला होता. जी कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध असते. ती कंपनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आणि निधी गोळा करण्यासाठी शेअरची ऑफर देते. ही योजना शेअर बाजारातील शेअरपेक्षा वेगळी असते.
अदानी एंटरप्राईजेसचा एफपीओ रद्द करताना अदानी यांनी बुधवारी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत बाजू मांडली. त्यांनी सर्व गुंतवणूकदारांचे आभार व्यक्त केले. तसेच एफपीओला दिलेल्या प्रतिसादाबाबत गुंतवणूकदारांचे कौतूक केले.
#WATCH | After a fully subscribed FPO, yday’s decision of its withdrawal would’ve surprised many. But considering volatility of market seen yday, board strongly felt that it wouldn’t be morally correct to proceed with FPO:Gautam Adani, Chairman, Adani Group
(Source: Adani Group) pic.twitter.com/wCfTSJTbbA
— ANI (@ANI) February 2, 2023
हा एफपीओ मंगळवारी यशस्वीरित्या बंद झाला होता. या एफपीओमध्ये गुंतवणुकीची शेवटची तारीख 31 जानेवारी ही होती. गेल्या आठवड्यात अनेक घडामोडी घडूनही, अस्थिर वातावरण असताना गुंतवणूकदारांनी विश्वास दाखविल्याबद्दल अदानी यांनी आभार मानले.
बाजारात सातत्याने चढउतार होत आहे. आमच्या शेअरमध्येही चढउतार होत आहे. अशा असामान्य परिस्थितीत एफपीओची प्रक्रिया सुरु ठेवणे नैतिकतेला धरुन नसल्याचे सांगत एफपीओ रद्द करण्यात आला. गुंतवणूकदारांचे कुठल्याही प्रकारे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा समूहाने केला आहे.
अदानी समूहाच्या शेअरमध्ये बुधवारी 28.5 टक्क्यांची पडझड झाली. हा शेअर 2,128.70 रुपयांवर बंद झाला. तर अदानी एंटरप्राईजेसचा शेअर 3,112 रुपयांहून 3,276 रुपयांच्या प्राईस बॅंडवर विक्री होत होता. अदानी एंटप्राईजेसचा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तराच्या 49 टक्के घसरला आहे. केवळ एका आठवड्यात हा शेअर 37 टक्के घसरला आहे.