DLF : ब्लॅकमेलरला असा शिकवला धडा! डीएलएफचे चेअरमन यांचा हा किस्सा वाचाच
DLF : हिंडनबर्ग अहवालानंतर अदानी समूह अजूनही सावरलेला नाही. या समूहाला अहवालाने पुरते चुरगाळून टाकले आहे. विरोधकांनी मोदी सरकारवर अदानी समूहाला मदतीचा आरोप लावला आहे. याविषयी डीएलएफचे चेअरमन के पी सिंह यांनी त्यांच्या आठवणी जाग्या केल्या.
नवी दिल्ली : अदानी समूह (Adani Group) सध्या अत्यंत अडचणीतून चालला आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर (Hindenburg Report) अदानी समूहाच्या शेअरमध्ये भूकंप आला आहे. अदानी इंटरप्राईजेसचा FPO सुरु होण्याच्या अगोदरच हिंडनबर्गचा अहवाल येऊन धडकला. अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले. एफपीओ मागे घेण्याची नामुष्की या समूहावर ओढावली. अजूनही या अहवालाचे धक्के अदानी समूहाला बसतच आहे. अदानी यांच्या संपत्तीत कमालीची घसरण झाली आहे. श्रीमंतांच्या यादीत दोन नंबर वरुन ते 26 व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. दरम्यान DLF समूहाचे संचालक के. पी. सिंह (K. P. Sinha) यांनी या सर्व घटनाक्रमावर त्यांच्या आठवणी जागविल्या. 15 वर्षांपूर्वी त्यांच्यावर गुदारलेल्या एका घटनेचा त्यांना आवर्जून उल्लेख केला. 15 वर्षांपूर्वी त्यांच्या कंपनीच्या आयपीओवेळी (IPO) त्यांना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता.
अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी साम्राज्याला सातत्याने धक्के बसत आहे. पण भारतातील एका उद्योग समूहाच्या हेलकाव्याने सर्व भारतीय व्यापाऱ्याला, शेअर बाजाराला धक्का बसेल, हा अंदाज खोटा ठरला. जागतिक गुंतवणूकदारांचा भरवसा अद्यापही भारतीय शेअर बाजारावर कायम आहे. अदानी यांना अजून या धक्क्यातून सावरायला मोठा अवकाश आहे. पण त्यांना वृद्धी दर गाठावा लागणार आहे.
डीएलएफचे चेअरमन के पी सिंह यांनी पीटीआयला एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी त्यांच्या व्यवसायातील अशा एका वादळाचा उल्लेख केला आहे. त्यानुसार DLF, IPO घेण्याच्या तयारीत होती. त्यावेळी कॅनडातील एका कंपनीने त्यांच्याविरोधात अहवाल सार्वजनिक करण्याची धमकी दिली होती. त्यावेळी सिंह यांनी त्या फर्मला तुम्हाला जे करायचे ते करा, असा सज्जड दम भरला. त्यामुळे त्यांना मोठा धडा बसला.
हिंडनबर्ग रिपोर्टमुळे परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करणार नाहीत, ही बाब तथ्यहिन असल्याचा दावा सिंह यांनी केला. गुंतवणूकदारांचा कुठलाही तोटा होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या वादात पंतप्रधानांना ओढणे उचित नसल्याचे सांगत त्यांनी याप्रकरणाशी पंतप्रधानांना काहीच देणे-घेणे नसल्याचा दावा केला. बँकांना ज्यावेळी योग्य वाटते, त्यावेळी ते व्यावसायिकांना कर्ज अथवा इतर मदत करत असल्याचे ते म्हणाले.
या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअरवर संकट कोसळले. 24 जानेवारीपासून या शेअरमध्ये सातत्याने पडझड सुरु आहे. ही घसरण कायम आहे. अदानी समूहाचे शेअर 70 टक्के घसरले आहेत. कंपनीचे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा 80 टक्के घसरले आहेत. म्हणजेच हे महागडे शेअर आता त्यांच्या खऱ्या किंमतीवर आल्याचा दावा करण्यात येत आहे.
अदानी समूहाला फ्रांसच्या टोटल एनर्जीज या कंपनीने मोठा झटका दिला आहे. अदानी समूहात या विदेशी गुंतवणूकदाराने मोठ्या गुंतवणुकीची तयारी केली होती. हायड्रोजन प्रोजेक्टसाठी अदानी समूहासोबत 50 अब्ज डॉलरचा प्रस्ताव कंपनीने राखीव ठेवला आहे.