रामदेव बाबा, टूथपेस्ट, तेल, साबण, शॅम्पूच्या व्यवसाय विक्रीच्या तयारीत, खरेदीदार तरी कोण?
Baba Ramdev : रामदेव बाबा यांच्या पतंजलीने न्यायपालिकेची चांगलीच खप्पामर्जी ओढावून घेतली होती. भ्रामक जाहिरातींवरुन कोर्टाने त्यांना चांगलाच दणका दिला. तर त्यानंतर योग शिबिरावरुन पण मोठा फटका बसला. आता व्यवसायासंबंधी नवीन अपडेट समोर येत आहे.
रामदेव बाबा (Baba Ramdev) यांची कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेड ही त्यांचा नॉन-फूड व्यवसाय विक्री करण्याच्या तयारीत आहे. टूथपेस्ट, तेल, साबण आणि शॅम्पूचा व्यवसाय विक्रीची तयारी करण्यात येत आहे. बाबा रामदेव यांची शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपनी पतंजली फूड्स लिमिटेड (Patanjali Foods Limited) हीच हा व्यवसाय खरेदी करणार आहे. तसा प्रस्ताव देण्यात आला आहे. कंपनीने शेअर बाजाराला या घडामोडींची माहिती दिली आहे. त्यानुसार, पतंजली आयुर्वेद लिमिटेडचा नॉन-फूड बिझनेसची विक्री करण्याविषयीचा प्रस्ताव मिळाला आहे. पतंजलीच्याच दोन कंपन्यांमध्ये खरेदी-विक्रीचा हा योग जुळून आला आहे.
आता होणार मूल्यांकन
कंपनीच्या बोर्डाने 26 एप्रिल रोजी या प्रस्तावावर चर्चा केल्याचे सांगितले आहे. पतंजली फूड्स लिमिटेडनुसार, प्रस्ताव मूल्यांकनासाठी मंजूरी देण्यात आली आहे. पतंजली आयुर्वेदची स्थापना बाबा रामदेव यांनी केली होती. ते कंपनीचे प्रवर्तक आहेत. तर आचार्य बालकृष्ण या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. प्रवर्तक गटाची नॉन-फूड व्यवसायात 50 टक्क्यांहून अधिक वाटा आहे.
पतंजली फूडचा वाढता कारभार
खाद्यतेल तयार करणारी कंपनी पतंजली फूड्स लिमिटेडला यापूर्वी रुची सोया इंडस्ट्रीज नावाने ओळखले जात होते. 2019 मध्ये बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आयुर्वेदने दिवाळखोरीच्या प्रकरणात ही कंपनी 4,350 कोटीत खरेदी केली होती.
- जून 2022 मध्ये कंपनीचे नाव बदलून पतंजली फूड्स लिमिटेड करण्यात आले.
- मे 2021 मध्ये पतंजली बिस्किट्स लिमिटेडची 60.03 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला.
- जून 2021 मध्ये पतंजली आयुर्वेदने नूडल्स -ब्रेकफास्ट बिझनेस 3.50 कोटींना केला खरेदी
- मे 2022 मध्ये पतंजली फूड्सने पतंजलि आयुर्वेदचा व्यवसाय 690 कोटींना केला खरेदी
पतंजली आयुर्वेदवरुन फटकारले
- पतंजली आयुर्वेद नुकतीच चर्चेत आली. सुप्रीम कोर्टाने प्रकरणात भ्रामक जाहिरातीवरुन चांगलेच फटकारले होते. बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या दोघांनी सार्वजनिकरित्या जाहीर माफी मागितली होती.
- आता पतंजली आयुर्वेदची उत्पादनं पतंजली फूड्सला विक्रीचा प्रस्ताव आहे. पतजंली फूड्सनुसार हा व्यवसाय आणि उत्पादन त्यांच्या पोर्टफोलिओशी मेळ खातो. त्यामुळे कंपनीच्या महसूलात आणि एबिटामध्ये वाढ होईल. पतंजली फूडसने एफएमसीजी व्यवसायात चांगलीची आघाडी उघडली आहे.