नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी अनेक उद्योग सुरु केले आहे. तर त्यांची कंपनी काही सेवा उद्योगातही अग्रेसर आहे. कंपनी काही शहरात प्रत्येक घरात वीजेचा (Electricity) पुरवठा करते. तर घरगुती गॅसचाही (Cooking Gas) पुरवठा करते. आता अदानी समूह तुमच्या घरात पाणी पुरवठ्याचेही काम करणार आहे. पाणी ही जीवनावश्यक गोष्ट आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थाकडे पाणी पुरवठ्याची (Water Distribution) जबाबदारी आहे. अदानी समूह आता ही सशुल्क सेवा देणार आहे.
अदानी समूह सध्या वीज, घरगुती गॅसचा पुरवठा करते. त्यात आता जलपुरवठा जोडल्या गेल्या आहे. अदानी समूह सध्या बंदर, विमानतळ, रस्ता, सिमेंट आणि एक्सप्रेस वे यांसारख्या सर्व प्रमुख व्यवसायांमध्ये अग्रेसर आहे.
पीटीआयच्या (PTI) वृत्तानुसार, अदानी इंटरप्रायजेस आता पाण्याचे शुद्धीकरण ते वितरण क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रात कंपनीने हे पाऊल ठेवले आहे. भविष्यात या क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचा दावा करण्यात येत आहे.
कंपनी पुढील आठवड्यात 20,000 कोटी रुपयांची फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) घेऊन येत आहे. अदानी समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगशिंदर सिंग यांनी मीडियाला या प्रकल्पाची माहिती दिली. कंपनीने 20,000 कोटी रुपयांच्या इश्यूसाठी 3,112 रुपये ते 3,276 रुपये प्रति शेअर किंमत ठेवणार आहे.
फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) पूर्णपणे नोंदणीकृत, सबस्क्राईब झाल्यास हा विक्रम ठरेल. यापूर्वी 2015 मध्ये कोल इंडियाच्या 22,558 कोटी रुपयांच्या इश्यू आला होता. त्यानंतर अदानी समूहाचा मोठा इश्यू असेल.
कोल इंडियाचा 15,199 कोटी रुपयांचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) ऑक्टोबर 2010 मध्ये आला होता. कंपनीचा एफपीओ 27 जानेवारी रोजी उघडेल आणि 31 जानेवारी रोजी बंद होईल. मोठ्या गुंतवणूकदारांसाठी एफपीओ एक दिवस अगोदरच उघडेल.