मोदी मॅजिक… शेअर बाजारात जबरदस्त उसळी, तुमच्या शेअरची किंमत किती झाली?
एक्झिट पोलच्या अंदाजानंतर सोमवारी शेअर बाजार उघडताच मोठी उसळी घेतली. पंतप्रधान मोदीच पुन्हा सत्तेवर येतील असे सर्वांचे अंदाज असून त्याचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारावरही दिसले. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांकी सुरूवात केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान शनिवारी संपले आणि त्यानंतर आलेल्या बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजप विजयाचा अंदाज वर्तवला. त्याचे पडसाद शेअर बाजारवरही दिसून आले. सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीने जबरदस्त उच्चांकी उसळी घेतली. त्यामुळे बाजारात दिवाळीसारखं वातावरण दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पावणेचार टक्क्यांपर्यंत वाढ पहायला मिळाली आहे. सेन्सेक्सने जुना रेकॉर्ड मोडीत काढत नवा उच्चांक गाठला आहे. तर निफ्टीमध्येही 800 हून अधिक अंकांची वाढ झाल्याचे दिसून आले. सेन्सेक्समध्ये 2,621.98 अंकांची वाढ होऊन निर्देशांक 76 हजारांच्याही पुढे गेला. तसेच निफ्टीमध्येही 807.20 अंकांची वाढ होत निर्देशांक 23,337 च्याही पुढे गेला.
कंपन्यांबद्दल बोलायचं झालं तर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून आले. तसेच अडानींच्या शेअरमध्येही वाढ होताना दिसत आहे. टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये 2 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ दिसून आली. बाजार उघडताच गुंतवणूकादांरांची 15.40 लाख कोटींची कमाई झाली आहे.
1 जून रोजी देशभरात शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली होती. त्यामध्ये एनडीएला बंपर आघाडी मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला. काही एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील. त्याचा परिणाम 3 जून रोजी शेअर बाजारात दिसून आला.
जर 4 जून रोजी एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, निवडणुकीचे निकाल दिसून आले तर शेअर बाजारात आणखी वाढ दिसण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, शेअर बाजारातील वाढ केवळ एक्झिट पोलमुळेच नाही तर जीएसटीचे चांगले संकलन, चांगले जीडीपी आकडे, डॉलरच्या तुलनेत रुपयाची वाढ आणि कच्च्या तेलाच्या घसरणीमुळेही दिसून येत आहे.
निफ्टीमध्ये 800 अंकांची वाढ
दुसरीकडे, निफ्टी हा निर्देशांकही 800 हून अधिक वाढीसह 23,337 अंकांवर उघडला. मात्र, काही वेळानंतर तो 23,107 वर दिसला. निफ्टी शेअर्समध्ये, अदानी पोर्टचा शेअर सर्वाधिक 9 टक्क्यांनी वाढला. याआधी शुक्रवारी बंद झालेल्या ट्रेडिंग सत्रात निफ्टी 22500 च्या आसपास बंद झाला होता.
बाजार उघडताच शेअर्सची उसळी
शेअर बाजारातील झालेल्या वाढीदरम्यान बीएसईच्या सर्व 30 शेअर्समध्ये जोरदार वाढ दिसून आली. जर सर्वात मोठ्या वाढत्या शेअर्सबद्दल बोलायंच झालं तर लार्ज कॅपमध्ये, पॉवर ग्रिड (5.44%), NTPC (5.21%), M&M (5.00%), SBI (4.51%), L&T (4.38%), IndusInd Bank ( 4.15) यांच्यात वाढ झाल्याचे दिसत आहे. तर मिड कॅपमध्ये समाविष्ट असलेल्या REC लिमिटेड 7.50%, श्रीराम फायनान्स 7.07%, हिंद पेट्रो 7.03%, PFC 6.78% आणि IRFC 5.65% शेअर्स वाढले. स्मॉल कॅप श्रेणीमध्ये समाविष्ट असलेले Praveg शेअर 10 टक्के, Moschip 9.98 टक्के, IRB 8.44 टक्के आणि JWL 8.43 टक्के यांनी मजबूत वाढीसह व्यवहार केला.