नवी दिल्ली | 27 ऑक्टोबर 2023 : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळावर अखेर अनंत अंबानी यांची वर्णी लागली. बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये आकाश अंबानी आणि इशा अंबानी यांच्या नावावर पण मोहोर लागली. यापूर्वी अनंतच्या नावावरुन वाद झाल्याचे वृत्त समोर आले होते. पण त्यात कितपत सत्यता होती, हे आज झालेल्या मतदानावरुन स्पष्ट झाले. अनंत अंबानीच्या पारड्यात भरभरुन मतं पडली. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या तीनही मुलांच्या संचालक मंडळात नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्तीला मंजूरी मिळाली. शेअरधारकांनी ग्रीन सिग्नल दिल्याने हा निर्णय तात्काळ लागू झाला.
यापूर्वीचा झाला होता निर्णय
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची 46 वी वार्षिक सर्वसाधारण बैठक 28 ऑगस्ट 2023 रोजी झाली होती. त्यात रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी संचालक मंडळातील बदलाची घोषणा केली होती. त्यानुसार, बोर्ड ऑफ डायरेक्टर्समधून नीता अंबानी बाजूला होतील. इशा, आकाश आणि अनंत अंबानी हे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून बोर्डात सहभागी होतील, असे ठरले होते.
वादावर पडला पडदा
या महिन्याच्या सुरुवातीला अनंत अंबानी यांच्या नियुक्तीला दोन सल्लागार कंपन्यांनी विरोध केला होता. आंतरराष्ट्रीय संस्था इन्स्टिट्यूशनल शेअरहोल्डर सर्व्हिसेज इंक (ISSI) आणि मुंबईतील इन्स्टिट्यूशनल इव्हेस्टर एडव्हायझरी सर्व्हिसेज (IIAS) यांनी विरोध दर्शवला होता. अनंत अंबानी यांचे वय आणि अनुभव कमी असल्याचा दावा दोन्ही संस्थांनी केला होता. पण शेअरधारकांनी अनंत अंबानी याच्या पारड्यात 92.7 टक्के मतं टाकलीत. संचालक मंडळातील त्याच्या सहभागावर शिक्कामोर्तब झाले. अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये 4 कंपन्यांचे संचालक आहेत. आता ते मूळ कंपनीच्या संचालक मंडळात नॉन एक्झिक्युटिव्ह आणि नॉन इंडिपेंडेंट डायरेक्टर म्हणून कार्यरत असतील.
आकाश आणि इशाच्या नावावर मोहोर
अनंतसोबतच आकाश आणि इशाच्या नावावर मोहोर उमटली आहे. त्यांना पण संचालक मंडळात जागा मिळाली आहे. या दोघांच्या नावाला आडकाठी नव्हती. या नियुक्त्यांविषयी रिलायन्स इंडस्ट्रीजने स्टॉक एक्सचेंजला सूचीत केले आहे. कंपनीने यापूर्वीच ई-मतदानाच्या प्रक्रियेबाबत माहिती दिली होती. इशा अंबानी हिला 98 टक्के तर आकाश अंबानी याला पण तितकेच मतदान झाले आहे.