Inflation : महागाईचा आणखी एक धक्का, गेल्या वर्षभरात मसाल्यांच्या दरात मोठी वाढ
गेल्या वर्षभरात मसाल्यांच्या पदार्थांमध्ये मोठी भाव वाढ पहायला मिळत आहे. या भाववाढी मागे मसाल्यांचा तुटवडा हे कारण सांगितले जात आहे.
मुंबई : महागाईमुळे (Inflation) आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरापासून ते खाद्यतेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वच वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. आता महागाईचा आणखी एक धक्का बसला आहे. तो म्हणजे गेल्या वर्षभरात मसाल्यांच्या दरात (Spices Price) मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. मसाल्यातील प्रमुख पदार्थ असलेल्या धण्याच्या भाव गेल्या वर्षभरात जवळपास अडीच पटीने वाढले आहेत. लाल मिरचीच्या भावात 50 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. धणे आणि लाल मिरचीसोबतच जीरा, बडीसोप आणि मेथीदान्याच्या भावात देखील वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात ठोक महागाईची (Retail Inflation) आकडेवारी समोर आली. या आकडेवारीतून मसाल्यांच्या पदार्थांमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे, म्हणजेच आता नागरिकांना अन्नधान्य आणि भाजीपाल्यात झालेल्या दरवाढीसोबतच मसाल्यांच्या पदार्थात झालेल्या दरवाढीचा देखील सामना करावा लागणार आहे.
उत्पादनात घट
यंदा मसाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. या दरवाढीमागील प्रमुख कारण म्हणजे सध्या देशात असलेला मसाल्यांचा तुटवडा हे सांगण्यात येत आहे. चालू वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत मसाल्यांच्या पदार्थांचे उत्पादन कमी झाले. उत्पादन कमी आणि मागणीत वाढ झाल्याने यंदा मसाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. यंदा धण्याचे उत्पादन जवळपास 80 हजार टनांनी घटले आहे. तर दुसरीकडे जिरे आणि इलायचीचे उत्पादन देखील यंदा कमीच आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मसाल्यांचे भाव आणखी वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयोग
दुसरीकडे देशात गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात इम्युनिटी वाढवण्यासाठी मसाल्यांचा काढा उपयुक्त असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे भारतीय मसाल्याला अचानक जगभरात मागणी वाढली. कोरोना काळात आणि आताही अनेक जण इम्युनिटी वाढवण्यासाठी मसाल्यांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देखील मसाल्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली. मात्र दुसरीकडे उत्पादनात घट झाल्याने मसाल्याच्या भावात तेजी आली.
मसाल्यांचा समावेश अत्यावश्यक वस्तुंमध्ये नाही
मसाल्यांचा अत्यावश्यक गोष्टींमध्ये समावेश होत नाही. अन्नधान्य आणि तेलाचा समावेश हा अत्यावश्यक गोष्टींमध्ये होत असल्याने गव्हाचे दर वाढताच महागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या वतीने गव्हाच्या निर्यातीवर निर्बंध लावण्यात आले. दुसरीकडे खाद्यतेलाचे भाव वाढताच सरकारच्या वतीने खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणात आयात करण्यात आली. मात्र मसाल्यांचा समावेश हा अत्यावश्यक सेवेत होत नसल्याने मसाल्यांचे दर कमी करण्यासाठी सरकारकडून काही ठोस पाऊले उचलले जाण्याची शक्यता कमीच आहे.