Byju’s News : बायजूजवर शनी वक्री! या ठिकाणी लपवले पैसे, देणेकऱ्यांचा गंभीर आरोप
Byju's News : भारतीय शिक्षण क्षेत्रात अगदी काही वर्षांपूर्वी हायटेक क्रांती आणणाऱ्या बायजूस या कंपनीचे ग्रह फिरले आहेत. एकीकडे बाजारात पत कमी होतानाच देणेकऱ्यांनी पण कंपनीवर हल्ला चढवला आहे. कंपनीने अमेरिकेत या ठिकाणी पैसा लपविल्याचा त्यांनी गंभीर आरोप केला आहे.
नवी दिल्ली | 13 सप्टेंबर 2023 : दिग्गज एज्युटेक स्टार्टअप बायजूज(Byjus) चे ग्रहमान फिरले आहे. त्यांच्यावरील संकटांची मालिका खंडित होताना दिसत नाही. कंपनीच्या हेतूवरच आता देणेकऱ्यांनी बोट दाखविल्याने बायजूज आणखी अडचणीत आली आहे. बायजूज या स्टार्टअपने (Startup) अवघ्या काही वर्षात हेवा वाटावा असे यश मिळवले होते. पण काही दिवसांपासून हा स्टार्टअप वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता या स्टार्टअपवर देणेकऱ्यांनी (Lenders) एका फंड हाऊसमध्ये 53.3 कोटी डॉलर लपविल्याचा गंभीर आरोप केला आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी पुन्हा बाजारातून भांडवल जमा करुन देणेकऱ्यांची परतफेड करण्याची हमी भरली होती. पण आता या ताज्या आरोपामुळे कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. बाजारातही कंपनीची पत खालवल्याने सगळीकडून एकदाच कंपनीवर संकट येऊन कोसळली आहे.
काय आहेत आरोप
देणेकऱ्यांच्या आरोपानुसार बायजूजने केवळ तीन वर्षे उणेपुऱ्या एका Camshaft Capital Fund मध्ये 53.3 कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक संस्था विलियम सी मॉर्टन याने सुरु केली आहे. तो केवळ 23 वर्षांचा आहे. या फर्मसाठीचे त्याने कोणतेही प्रशिक्षण पण घेतलेले नाही. पैसा परत मिळावा यासाठी गुंतवणूकदारांनी बायजूजकडे तगादा लावला आहे. त्यांनी मियामी डेड काऊंटी कोर्टात याविषयीचे कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात बायजूने या नविन फर्ममध्ये पैसा लपविल्याचा आरोप करण्यात आला आहे. कागदपत्रानुसार, या फर्मचा मुख्य व्यवसाय मियामीतील IHOP पॅनकेक रेस्टारंट चालविणे हा आहे.
आलिशान कारचा ताफा
देणेकऱ्यांनी बायजूजवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानुसार, बायजूने पैसा पाठविल्यावर विलयम याच्या नावावर आलिशान कारची नोंदणी दिसून येत आहे. त्यामध्ये Ferrari Roma, Lamborghini Huracan EVO, Rolls Royce Wraith यांचा समावेश आहे. गुंतवणूकदारांचा पैसा असा वळविण्यात आल्याचा अप्रत्यक्ष आरोप करण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांनी दिला नकार
न्यूज एजन्सी ब्लूमबर्गने याविषयी एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, त्यांनी या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला या घाडमोडींविषयी विचारले. तिने विलियम, कॅनशॅफ्ट अथवा बायजूज ही नावे पहिल्यांदाच ऐकल्याचा दावा केला. ती गेल्या दहा वर्षांपासून या ठिकाणी काम करत असल्याचे तिने स्पष्ट केले.
आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी
देणेकरी आणि बायजूस यांच्यामध्ये सध्या शीतयुद्ध सुरु आहे. बायजूजवर देणेकऱ्यांचे 120 कोटी डॉलर थकीत आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांवर बेछूट आरोप करत आहेत. देणेकऱ्यानुसार बायजूज डीफॉल्ट झाली आहे. तिचे दिवाळे निघाले आहे. तिने पूर्वीच दुसऱ्या फर्ममध्ये पैसा लपविला आहे. तर बायजूजने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. बायजूजवर कब्जा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करण्यात आला आहे.