Israel-Hamas War | इस्त्राईल-हमासची युद्धखोरी जगाला बुडवणार, घरचे बजेट बिघडणार
Israel-Hamas War | हमासची आगळीक संपूर्ण जगाला भोगावी लागणार आहे. इस्त्राईल-हमासला युद्ध ज्वर चढतो आणि उतरतो. पण त्याचे परिणाम सर्वच देशातील नागरिकांना भोगावे लागतात. अनेक वस्तूंच्या किंमती महाग होण्याची शक्यता आहे. रशिया-युक्रेन युद्धाचे चटके अगोदरच सर्वांना सहन करावे लागत आहेत. त्यात हे नवीन संकट पुढ्यात आले आहे.
नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : हमासच्या युद्धखोरीमुळे जगात पुन्हा महागाईच्या संकटात लोटले जाणार आहे. इस्त्राईलवर अचानक हल्ला करुन हमासने मध्य-पूर्व भागात पुन्हा अशांतता माजवली. अरब राष्ट्रांसोबत इस्त्राईलचे संबंध सुधारत असताना आता युद्धाची व्याप्ती वाढण्याची भीती आहे. हे युद्ध गाजा पट्ट्यापुरते मर्यादीत राहिलेले नाही. इराण, लेबनॉन या देशांना पण हमासची लागण झाली आहे. हे देश पण युद्धात उडी घेण्यासाठी आसूसले आहेत. पण त्याचा परिणाम संपूर्ण जगाला भोगावा लागू शकतो. भारतापर्यंत हे संकट येऊन ठेपले आहे. त्याची झळ भारतीय नागरिकांना पण बसणार आहे. असा आपल्या खिशावर ताण येणार आहे.
युद्धामुळे बिघडेल बजेट
रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर गव्हाच्या, तांदळाच्या, डाळींच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच इतर कृषी उत्पादनांवर ताण आला आहे. इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धामुले कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. मध्य-पूर्वेतील अशांततेमुळे चीनसह भारताच्या अनेक योजनांवर पाणी फेरल्या गेले आहे. त्यामुळे स्वस्तात वस्तू आयात करण्याचे भारताचे स्वप्न लांबणार आहे.
कच्चे तेल रडवणार
इस्त्राईल-हमास युद्धामुळे जागतिक पातळीवर कच्चा तेलाच्या निर्यातीला फटका बसू शकतो. तसेच आखाती देश तेल उत्पादनात कपात करु शकतात. मागणी पुरवठ्याचे गणित विस्कळीत झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकू शकतात. शुक्रवारी ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत 2 डॉलरची वाढ होऊन ते 87 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. इराण या युद्धात उतरला आहे. हिजबुल्ला दहशतवाद्यांना आणि हमास दहशतवाद्यांना इराण आर्थिक, शस्त्रात मदत पोहचवत आहे. त्यामुळे इराण तेलाच्या किंमती वाढविण्याची भीती आहे.
या वस्तू होतील महाग
बिझनेस टुडेनुसार, तज्ज्ञांच्या दाव्यानुसार, युद्ध अजून लांबल्यास त्याचा फटका जगाला बसेल. स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीनसह इतर अनेक वस्तूंच्या किंमती वाढतील. पण सध्या मुबलक साठा असल्याने दिवाळीपर्यंत, सणासुदीत या वस्तूंच्या किंमतीत वाढ होणार नाही. पण कच्चा माल वेळेत पोहचला नाही तर मग उत्पादनावर परिणाम होऊन किंमतीत वाढ होऊ शकते.
नित्योपयोगी वस्तू महागतील
नित्योपयोगी वस्तूवर मात्र मोठा परिणाम दिसून येईल. FMCG Sector मधील वस्तूंचे भाव वाढतील. अगोदरच महागाईने या सेक्टरमधील अनेक कंपन्यांना विक्रीत मोठी कसरत करावी लागत आहे. या कंपन्यांना कच्चा मालाचा पुरवठा वेळेत न झाल्यास त्याचा परिणाम ग्राहकांवरच नाही तर या कंपन्यांवर पण दिसून येईल.