ATM मधून रोख रक्कम काढणे महागणार, आता किती रुपये आकारणार?
ATM Cash Transaction : एटीएममधून रोख रक्कम काढणे अजून महाग होणार आहे. कन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने (CATMI) मोठ्या निधीसाठी इंटरचेंज शुल्क वाढविण्याची वकिली केली आहे. त्याचा फटका बँक ग्राहकांना, एटीएम वापरकर्त्यांना बसणार आहे.
नोटबंदीनंतर देशात डिजिटल व्यवहारांची लाट आली. पण तरीही बाजारात रोखीतील व्यवहारा मोठ्या प्रमाणात होतात. अनेकांना डिजिटल ॲपवर अजूनही विश्वास नाही. अथवा अनेक व्यवहारांसाठी त्यांना रोखीतील व्यवहार आवडतो. त्यासाठी अर्थातच एटीएम हा सर्वोत्तम पर्याय आहे. आता एक बातमी समोर येत आहे की, एटीएमवरुन पैसे काढण्यासाठी अधिक शुल्क आकारण्यात येऊ शकते. देशातील एटीएम ऑपरेटर्स एटीएम रोख रक्कम काढण्यावर इंटरचेंज शुल्कात वाढीची मागणी करत आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक आणि राष्ट्रीय देयके महामंडळाला (NPCI) यासाठी साकडे घालण्यात आले आहे.
किती वाढेल शुल्क
इकोनॉमिक टाईम्समधील एका वृत्तानुसार, कन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने (CATMI) या व्यवहारांसाठी जास्त निधी जमा करण्यासाठी वकिली केली आहे. त्यासाठी इंटरचेंज शुल्क वाढवून 23 रुपये करण्याची मागणी केली आहे. दोन वर्षांपूर्वीच इंटरचेंज शुल्क वाढीचा प्रस्ताव दिला होता, असे एजीएस ट्रांसेक्ट टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक स्टेनली जॉनसन यांनी सांगितले. यामागणासाठी केंद्रीय बँकेशी संपर्क करण्यात आला आहे. काही सदस्यांनी इंटरचेंज शुल्क 21 रुपये तर काहींनी हे शुल्क 23 रुपये करण्याची सूचना केल्याचे म्हणणे त्यांनी मांडले.
सध्या 17 रुपये शुल्क
एजीएस ट्रांसेक्ट टेक्नॉलॉजीजच्या दाव्यानुसार, गेल्यावेळी शुल्क वाढविण्यासाठी बराच कालावधी लागला होता. पण यावेळी त्याच्यावर सहमती होण्याची शक्यता दिसत आहे. शुल्क वाढीसाठी यावेळी अधिक कालावधी लागणार नाही. वर्ष 2021 मध्ये एटीएम व्यवहारासाठी इंटरचेंज शुल्क 15 रुपयांहून वाढून 17 रुपये करण्यात आले होते.एटीएम कार्ड देणारी बँके हे शुल्क देते. तर ज्या बँकेच्या एटीएममधून ग्राहक रोख रक्कम काढतो, त्या बँकेला हे शुल्क देण्यात येते. वर्ष 2021 मध्ये एटीएम व्यवहारांसाठी ग्राहकांकडून वसूल करण्यात येणाऱ्या शुल्काची मर्यादा 20 ते 21 रुपये प्रति व्यवहार करण्यात आली होती.
कितीदा काढू शकता मोफत रक्कम
खातेदाराला प्रत्येक महिन्याला पाच वेळा त्याच बँकेच्या एटीएममधून मोफत रक्कम काढता येते. सध्या बँका सहा प्रमुख महानगर, बेंगळुरु, चेन्नई, हैदरबाद, कोलकत्ता, मुंबई आणि नवी दिल्लीत ही सेवा देत आहे. तर इतर शहरात महिन्याला तीन वेळा मोफत व्यवहार करता येतो.