नवी दिल्ली | 10 नोव्हेंबर 2023 : आज धनत्रयोदशी आहे. सराफा बाजारात आता तुफान गर्दी असेल. दिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानण्यात येते. सोने खरेदी करताना सतर्क राहणे, सजग राहणे आवश्यक आहे. 24 कॅरेट सांगून तुमच्या माथी किती कॅरेटचे दागिने मारण्यात येतात. शुल्काच्या नावाखाली कितीचा गंडा घालण्यात येतो हे लक्षात घ्या. नाहीतर ज्वेलर तुम्हाला फसवल्याशिवाय राहणार नाही. दिवाळी आणि धनत्रयोदशीला महिला वर्ग खास करुन दागदागिने खरेदी करतो. पण सराफा बाजारात जाताना अगोदर किंमतींचा अंदाज घेणे आवश्यक आहे. तसेच शुद्ध सोन्याची खात्री असल्याशिवाय खरेदी करणे ही पण चूक ठरते.
या तीन सेवांचे द्यावे लागते शुल्क
केंद्र सरकारनुसार, दागदागिने खरेदी करताना केवळ तीन सेवांचे शुल्क अदा करावे लागते. वजनानुसार सोन्याच्या दागदागिन्यांची किंमत, घडवण-मेकिंग चार्ज आणि 3 टक्के जीएसटी हे तीन सेवांचे शुल्क द्यावे लागते. तुम्ही ऑनलाईन अथवा ऑफलाईन सोने खरेदी करत असाल तरी 3 टक्के जीएसटी शुल्क द्यावे लागेल.
अतिरिक्त शुल्क जोडल्यास करा विचारणा
सोने खरेदी केल्यावर सराफाकडून बिल घ्या. या बिलात या तीन शुल्काव्यतिरिक्त इतर चार्जेस लावण्यात आले असतील तर त्याची विचारणा दुकानदाराकडे करा. कारण अनेक ज्वेलर्स पॉलिस वेट वा लेबर चार्जच्या नावाखाली इतर रुपये जोडतात. त्यामुळे हे शुल्क देण्यास नकार द्या. असे केल्यास तुमचा अतिरिक्त खर्च वाचेल. दुकानदाराची तुम्हाला तक्रार पण करता येते.
हॉलमार्कनुसार कॅरेट
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
घरबसल्या जाणून घ्या किंमत
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
BIS Care App
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care App डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते.