B R Shetty : एका ट्वीटने कोट्यवधींचे साम्राज्य बर्बाद, श्रीमंतीने अशी सोडली साथ
B R Shetty : कधी पैसा पाण्यासारखा वाहत होता. खासगी जेट विमानाने एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास सुरु होता. श्रीमंती पायाशी लोळण घेत होती. पण रात्रीतूनच सर्व काही संपले. शिखरावरुन हा उद्योजक थेट रस्त्यावर आला. शॉर्ट सेलिंग कंपनीच्या एका ट्वीटने या उद्योगपतीचे आयुष्य उद्धवस्त केले. त्याला जमिनीवर आणले.
नवी दिल्ली | 6 ऑक्टोबर 2023 : नशीबाचे फासे पालटले की नेहमी सोबत असणारे पण साथ सोडतात म्हणतात. काही उदाहरणं डोळ्यासमोर आली की त्यावर विश्वास बसतो. श्रीमंती लोळण घेत असलेली काही माणसं थेट जमिनीवर येतात. काही तरी गडबड होते आणि राजाचा रंक होतो. नशीब असा खेला होबे करते की, भलीभली माणसं कफल्लक होतात. असाच किस्सा या श्रीमंत उद्योजकासोबत (Richest Businessman) घडला. जगातील सर्वात उंच बुर्ज खलिफात या व्यक्तीचे कार्यालय होते. ते सुद्धा त्याला विकावे लागले. पैसा पाण्यासारखा वाहत होता. खासगी जेट दिमतीला होते. श्रीमंती पाणी भरत होती. पण एका रात्रीतून हे सर्व संपले. शॉर्ट सेलिंग कंपनीच्या एका ट्वीटने त्याची वाताहत केली.
फ्लॅशबॅक
1973 मध्ये कर्नाटक येथील बी आर शेट्टी (B R Shetty) करीअरसाठी युएई येथे पोहचले. त्यांनी एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून श्रीगणेशा केला. काही वर्षानंतर त्यांनी NMC Group स्थापला. या कंपनीने हळूहळू हातपाय पसरले. हेल्थ केअर पुरवठादार म्हणून नाव कमावले. स्वतःची नवीन ओळख तयार केली. एमआरची नोकरी करणाऱ्या शेट्टी यांनी एका छोट्या खोलीत कार्यालय थाटले. कंपनीने काही दिवसातच आघाडी घेतली.
श्रीमंती पाणी भरु लागली
कंपनी वाढली तसा बीआर शेट्टी यांचा दबदबा वाढला. पैसा लोळण घ्यायला लागला. त्यांचा कारभार, पसारा वाढत गेला. बुर्ज खलिफा या उंच इमारतीत त्यांनी दोन मजले खरेदी केले. युएईमध्ये त्यांची वेगवेगळ्या भागात संपत्ती होती. आलिशान कारचा ताफा होता. स्वतःचे खासगी विमान होते. दुबईतील वर्ल्ड सेंटरमध्ये स्वतःची मालमत्ता होती. सौदी अरबच्या प्रभावशाली व्यक्तीत त्यांची गणना होऊ लागली.
18000 कोटींचे मालक
शेट्टी यांची कंपनी NMC हेल्थकेअरने काही वर्षातच मोठा पल्ला गाठला. त्यांच्या कंपनीचे नेटवर्थ 16500 कोटी रुपयांवर पोहचले. त्यांची एकूण संपत्ती 18000 कोटींच्या घरात होती. पण एका ट्वीटने त्यांचे आयुष्य पालटले.
का झाली वाताहत
एका ट्वीटने त्यांच्या साम्राज्यावर जणून बॉम्बच टाकला. 2019 मध्ये युकेच्या एका शॉर्ट सेलिंग कंपनीने, मडी वॉटर्सने एक ट्वीट केले. त्यात शेट्टी यांनी कर्ज कमी दाखवण्यासाठी कॅश फ्लो वाढविल्याचा आरोप त्यात करण्यात आला होता. इतर पण आरोप करण्यात आले होते. यामुळे त्यांच्या कंपनीचे शेअर धडाधड कोसळायला सुरुवात झाली. शेट्टी यांची संपत्ती 1.5 अब्ज डॉलरपर्यंत घसरली. शेअरची घसरण थांबता थांबेना. गुंतवणूकदारांनी धडाधड विक्रीचे सत्र सुरु केले. कंपनीवर 1 अब्ज डॉलरच्या कर्जाची बाब समोर आली. याचा असा फटका बसला की शेट्टी यांना त्यांची 16 हजार कोटींची कंपनी अवघ्या 74 रुपयांना विकावी लागली.