Repo Rate : मन अजून करा मोठं, बाबांनो, आपलं नशीबच फाटकं, पुन्हा महागाईचे चटके बसणार!
Repo Rate : महागाईपासून, महागड्या कर्जापासून, वाढत्या ईएमआयपासून सूटका होईल, असे वाटत असेल तर हे केवळ दिवास्वप्न ठरु शकते. येत्या एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पुन्हा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काय आहे हे प्रकरण, ज्याच्या तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम...
नवी दिल्ली : महागाईपासून, महागड्या कर्जापासून, वाढत्या ईएमआयपासून सूटका होईल, असे वाटत असेल तर हे केवळ दिवास्वप्न ठरु शकते. येत्या एप्रिल महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुन्हा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आरबीआयने रेपो दरात (Repo Rate) 0.25 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे कर्जे महागली आहेत. तर ज्यांनी कर्जे घेतली आहेत, त्यांचा हप्ता वाढला आहे. आता एप्रिल महिन्यात कडक उन्हासह महागाईचे चटके बसू शकतात. आरबीआय पुन्हा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एप्रिल महिन्यात रेपो दरात 0.25 टक्क्यांची वाढीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यावरील ईएमआय वाढेल. महागाई आणि ईएमआयच्या (EMI) बोजा खाली सर्वसामान्य भरडल्या जाईल.
RBI ने गेल्या वर्षभरात व्याजदर वाढीचा धडाका लावला आहे. महागाईला लगाम घालण्यासाठी रेपो दरात वाढ करण्यात येत आहे. येत्या काही महिन्यात पुन्हा रेपो दरात वाढीचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रेपो दरात 25 बीपीएस वाढीची शक्यता आहे. जागतिक बाजारात अनिश्चितता आहे. गेल्या एक वर्षापासून भडकलेले रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही सुरु आहे. अमेरिका आणि मित्र राष्ट्राने अप्रत्यक्षरित्या या युद्धात सहभाग घेतल्याने बाजारावर अनिश्चिततेचे ढग आहेत. या सर्वांचा परिणाम महागाई वाढण्यावर होत आहे.
महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयला कडक पावलं टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बुधवारी पतधोरण समितीच्या बैठकीचा तपशील जाहीर झाला. त्यात आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, किंमती वाढतच आहे. महागाई वाढत आहे. त्यामुळे महागाईशी दोन हात करण्यासाठी उपाय योजना कराव्या लागतील.
महागाई काबूत ठेवण्यासाठी, आटोक्यात ठेवण्यासाठी येत्या काही दिवसांत व्याज दरात 25 बेसिस पॉईंटची वाढ करण्याचा अंदाज आहे. एक्यूइट रेटिंग्स या रेटिंग एजन्सीने केलेल्या दाव्यानुसार, आरबीआय महागाई आटोक्यात आणण्यासाठी अजून कडक उपाय करेल. येत्या काही दिवसात 25 आधार अंकांची वाढ होईल. एक्यूइट रेटिंग्सने केलेल्या दाव्यानुसार, एप्रिल 2023 मध्ये आरबीआय रेपो दरात 25 बीपीएसची वाढ करु शकते.
अर्थात या धोरणाचा सर्वसामान्यांना मोठा परिणाम होईल. दैनंदिन गरजा भागविण्यासाठीची कसरत आणि वाढता ईएमआय या कात्रीत सर्वसामान्य नागरिक अडकणार आहे. यापूर्वी ज्या बँका 6.5 टक्क्यांनी कर्ज देत होत्या. त्यांचे व्याजदर आता 8.85 टक्के होईल. सध्या कर्जदारांवर प्रति लाखांमागे 825 रुपयांच्या हप्त्याचा बोजा पडला आहे.