नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC वादात अडकली होती. अदानी समूहात (Adani Group) मोठ्या प्रमाणात केलेल्या गुंतवणुकीमुळे एलआयसीवर चौफेर हल्लाबोल झाला. या वादात अध्यक्षांना कार्यकाळ वाढून मिळाला नाही. या प्रकरणी विरोधकांनी संसद दणाणून सोडली होती. पण एलआयसीने व्यावसायिक कामगिरीत स्वतःला चांगलेच सिद्ध केले. दुसरीकडे अदानी समूह पण आता सावरल्याने त्यामाध्यमातून पण कंपनीला जबरदस्त फायदा झाला आहे. कंपनीने जोरदार नफा कमाविला. आता लाभांशाचे (Dividend) वाटप होणार असल्याने गुंतवणूकदार मालामाल होतील.
आकडेच किती बोलके
एलआयसीने त्यांच्या निव्वळ नफ्याची माहिती शेअर बाजाराला दिली. त्यानुसार, आर्थिक वर्ष 2022-23 मधील चौथ्या तिमाहीत कंपनीने पाच पट लाभ मिळविला. कंपनीचा नफा वाढून 13,191 कोटी रुपये झाला. गेल्या आर्थिक वर्षात याच समान तिमाहीत कंपनीला 2,409 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. भारतीय आयुर्विमा महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा एकूण महसूल मात्र घटला आहे. हा महसूली आकडा आता 2,01,022 कोटी रुपये आहे. तर गेल्यावर्षी समान तिमाहीत महसूल 2,15,487 कोटी रुपये होता.
महसूल घटला
LIC च्या पहिल्या वर्षातील प्रीमियममधील कमाई मार्च, 2022 मध्ये 14,663 कोटी रुपये होती. मार्च 2023 मध्ये हा महसूल 12,852 कोटी रुपयांवर घसरला. एलआयसीचा संपूर्ण आर्थिक वर्षातील निव्वळ नफा कित्येक पटीने वाढला. आता हा 35,997 कोटी रुपये होता. गेल्या आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये हा निव्वळ नफा 4,125 कोटी रुपये होता.
कंपनी गुंतवणूकदारांना देणार वाटा
तर एलआयसीच्या संचालक मंडळाने 2022-23 साठी 10 रुपयांचा फेस व्हॅल्यूवर 3 रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. एलआयसीचा शेअर बीएसईवर सध्या 0.56 टक्क्यांनी वाढून 607 रुपये प्रति शेअर झाला. शुक्रवारी दुपारी 11:35 मिनिटाला हा भाव होता. नफ्याची घोषणा होताच हा शेअर जोरदार पळाला. या शेअरमध्ये तेजीचे सत्र होते. तर एनएसई निर्देशांकावर पण हा शेअर जोरदार कामगिरी बजावत आहे.
अदानी समूहात किती गुंतवणूक
भारतीय आयुर्विमा महामंडळ आणि गौतम अदानी यांच्या कंपन्यातील गुंतवणुकीवर केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी भाष्य केले. लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी यावर उत्तर दिले. 1 जानेवारी रोजीच्या एका प्रसिद्धपत्रकाचा त्यांनी दाखला दिला. त्यानुसार, अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांमध्ये गेल्या वर्षी एलआयसीने एकूण 30,127 कोटींची गुंतवणूक केली आहे. द प्रिंटने केलेल्या दाव्यानुसार, सध्या अदानी समूहात केलेल्या गुंतवणुकीनुसार, एलआयसीला 11,000 कोटी रुपयांचा फायदा होईल.