Trending : बाटलीतून दारू नव्हं, बाटलीतून बांगडी, याला म्हंनत्यात सुपर्ब पॉझिटिव्ह!
Trending : आता बाटलीतून दारु नव्हं, बाटलीतून बांगडीचा प्रयोग राबविण्यात येणार आहे..हा अनोखा प्रयोग भारतातील या राज्यात राबविण्यात येत आहे.
पटना : ‘बांगडीत बांगडी दारुच्या बाटलीची’, असा सुंदर उखाणा तुमच्या कानावर आला तर आता नवल वाटू देऊ नका. कारण आता दारुच्या बाटलीतून (Liquor Bottle) दारू नाही तर या बाटल्यांतून बांगड्या (Bangles) आकाराला येणार आहेत. देशात प्रयोगाची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्याने (State) या अभिनव उपक्रमाचा श्रीगणेशा केला आहे.
बिहारमध्ये तशी तर दारुबंदी आहे. पण दारुचा चोरटा व्यापार अजूनही सुरुच आहे. पोलिसांनी यावर उपाय शोधला आहे. दारु पकडल्यानंतर बाटल्या पुन्हा बाजारात जाऊन सहज दारु उपलब्ध होते, हे पोलिसांनी हेरले आणि या प्रयोगाची भन्नाट जन्मकथा येथूनच सुरु झाली.
एप्रिल 2016 मध्ये राज्य सरकारने बिहारमध्ये संपूर्ण दारुबंदी लागू केली होती. राज्य उत्पादन अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने दारुच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. या बाटल्यांच्या खचातून बांगड्या आकारला येण्याची कल्पना पुढे आली.
दारु बंदीसाठी ज्या महिलांनी आंदोलन केले, त्यांना ही अनोखी भेट देण्याचे अधिकाऱ्यांनी ठरवले. कारण यापूर्वी नवऱ्याने अनेकदा मारहाण केल्याने या महिलांच्या हातातील बांगड्या अनेकदा फुटल्या होत्या.
दारु बंदी निरिक्षकांनी या दारुच्या बाटल्यांपासून बांगड्या तयार करण्याची आयडिया उचलून धरली. त्यांनी कसला ही वेळ न दवडता, महिलांच्या एका गटाला उत्तर प्रदेशात बांगड्या तयार करण्याच्या प्रशिक्षणासाठी पाठविले. एवढेच नव्हे तर राज्य सरकारने यासंबंधीचा कारखाना सुरु करण्यासाठी 1 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले.
या कारखान्यात दारुच्या विविध रंगबिरंगी बाटल्यांपासून बांगड्या तयार होणार आहे. या बांगड्या स्वस्तात महिलांना विक्री करण्यात येणार आहे. या व्यवसायातून राज्यातील बचत गटातील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
दारुच्या बाटलीच्या काचेपासून बांगडी तयार करण्याचा हा पहिलाच सार्वजनिक उपक्रम असल्याचा दावा करण्यात येत आहे. सरकारने ही या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. बिहार राज्य सरकारने दर महिन्याला 5 लाख दारुच्या बाटल्या जप्त केल्या होत्या. तसेच 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण 9 कोटी लिटर दारु जप्त करण्यात आली होती.