पगार तर 83 रुपये, सुरक्षेसाठी खर्च 120 कोटींचा, या अब्जाधीशाला भेटलात का?
$1 Salary Club : जगातील अब्जाधीशांच्या यादीतील या उद्योगपतीचा पगार ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. जगात काही उद्योजक आजही एक रुपया अथवा एक डॉलर पगार घेतात. मग तुम्हाला वाटतं असेल त्यांची अब्जावधींची कमाई येते तरी कुठून?
भारतातील आणि जगातील अनेक अब्जाधीशांच्या कंपनीचे मूल्य अब्जावधीत असते. पण नियमानुसार, त्यांना पगार मिळत नाही. अनेक अब्जाधीश वेतनापोटी केवळ एक रुपये अथवा एक डॉलर घेतात. मग तुम्हाला वाटत असेल की त्यांची कोट्यवधींची संपत्ती येते तरी कुठून? तर त्यांच्या कमाईचा मोठा हिस्सा हा अनेक प्रकारच्या परताव्यातून, शेअरमधून, लाभांशातून येतो. जगातील या बिझनेस टायकूनचा पगार पण जास्त नाही. त्याचे वेतन केवळ 1 डॉलर आहे. भारतीय चलनात 83 रुपये आहे. पण परताव्याच्या माध्यमातून त्याला एकूण 199 कोटी रुपये मिळतात.
199 कोटींची कमाई
83 रुपये वेतन घेणारा हा जगप्रसिद्ध उद्योजक मेटाचा(फेसबुक) संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग हा आहे. त्याला वेगळ्या पद्धतीने कमाईची रक्कम मिळते. अधिकृतरित्या तो केवळ $1 (83.30 रुपये) पगार घेतो. पण त्यापेक्षा परतावा, शेअरमधून कमाई, लाभांश यातून त्याला भलीमोठी कमाई होते. फॉर्च्युनच्या एका वृत्तानुसार, सिक्योरिटीज अँड एक्सचेंज कमिशनच्या एक अहवालाचा आधार घेत, मार्कला जवळपास 199 कोटी रुपये मेहनताना मिळत असल्याचे समोर आले आहे.
पगारापेक्षा सुरक्षेवर अधिक खर्च
झुकरबर्गला मूळ वेतन म्हणून $1 मिळतो. पण त्याला इतर मेहनताना म्हणून 24.4 दशलक्ष डॉलर म्हणजे 199 कोटी रुपये मिळतात. त्यात इतर अनुषांगिक लाभ मिळतो. पण त्याच्या कमाईचा मोठा भाग सुरक्षेवर खर्च होतो. झुकरबर्ग सारख्या उद्योगपतीला सुरक्षेची अत्यंत गरज आहे. तो जगातील प्रसिद्ध व्यक्ती आहे. 2023 मध्ये मेटाने त्याच्या सुरक्षा खर्चाची माहिती दिली होती. त्यानुसार, 2018 मध्ये जो सुरक्षेवर खर्च होत होता, त्यापेक्षा आता 40% टक्के वाढ झाली आहे.
इतका होतो सुरक्षेवर खर्च
कर्मचाऱ्यांच्या कपातीवेळी झुकरबर्गने त्याच्या सुरक्षा खर्चात कपात केली होती. 2022 मध्ये त्याने घर आणि व्यक्तिगत प्रवासादरम्यान सुरक्षेसाठी जवळपास 120 कोटी रुपये खर्च केले होते. आता या रक्कमेत मोठी कपात करण्यात आली आहे. ही रक्कम कमी होऊन ती 78 कोटी रुपयांवर आली आहे. यामध्ये त्याच्या व्यक्तिगत प्रवासासाठी जवळपास 8 कोटी रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे.
10 वर्षांत मिळाले केवळ 11 डॉलर वेतन
मेटानुसार, झुकरबर्गच्या सुरक्षिततेवर मोठी रक्कम खर्च करणे आवश्यक आहे. कारण तो कंपनीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. झुकरबर्गने 2013 मध्ये लॅरी पेज, लॅरी एलिसन आणि स्टीव्ह जॉब्स यांच्यासह “$1 सॅलरी क्लब” मध्ये सहभागी आहे. या क्लबमध्ये त्या उद्योगपतींचा समावेश आहे. हे उद्योगपती प्रतिकात्मक रुपात केवळ एक डॉलर पगार घेतात. गेल्या 10 वर्षांपासून झुकरबर्गने केवळ 11 डॉलरचे वेतन घेतले आहे.