Bitcoin | 6 पैशांच्या बिटकॉईनची हनुमान उडी! गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई
Bitcoin Crypto Currency | बिटकॉईन गुंतवणूकदारांना अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मोठे फळ मिळाले आहे. त्यांची रिकामी झोळी आता ओसंडून वाहत आहे. सध्या एका बिटकॉईनचा भाव 72800 डॉलरच्या घरात पोहचला आहे. कधी 6 पैशांना मिळणारा बिटकॉईन या 15 वर्षांत रॉकेटपेक्षाही अधिक झेपावला आहे.
नवी दिल्ली | 14 March 2024 : जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टो करन्सी बिटकॉईनने इतिहास घडवला आहे. प्रत्येक वेळी नवीन इतिहास लिहिल्या जात आहे. याच तीन महिन्यात नवनवीन रेकॉर्ड बिटकॉईनने नावे जमा केले आहेत. बिटकॉईन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 5 मार्च रोजी रात्री बिटकॉईने 28 महिन्यांचा रेकॉर्ड मोडत 69 हजार डॉलरचा टप्पा ओलांडला होता. तर गेल्या आठवड्यात 9 मार्च रोजी बिटकॉईनने 70 हजार डॉलरची उंची गाठली. आता हे आभासी चलन 72800 डॉलरच्या घरात पोहचले आहे. येत्या काही महिन्यात बिटकॉईन 75,000 डॉलरचा पल्ला गाठण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.
त्याचा वेलू गगनावरी
2009 साली ज्यावेळी बिटकॉईनची सुरुवात झाली. त्यावेळी त्याची किंमत अवघी 0.060 रुपये होती. म्हणजे 6 पैसे होती. सातोशी नाकामोटो याने 2009 मध्ये बिटकॉईन या नावाने हे क्रिप्टो चलन तयार केले होते. आता या 15 वर्षांत बिटकॉईनने मोठा पल्ला गाठला आहे. आज बिटकॉईनची किंमत जवळपास 72 हजार 800 डॉलरच्या पार गेल्या आहेत. भारतीय चलनात ही किंमत 60,28,145 रुपये आहे. म्हणजे एक बिटकॉईन खरेदीसाठी 60 लाख खर्च करावे लागतील.
मार्केट कॅप उंचावले
डिसेंबर 2021 नंतर बिटकॉईन 63,725 डॉलरपेक्षा तो पुढे गेला. बिटकॉईन या वर्षाच्या सुरुवातीला 3 जानेवारी 2024 रोजी किंमत 45 हजार डॉलरवर होते. येत्या काही महिन्यात बिटकॉईन 75,000 डॉलरचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या बिटकॉईनचे बाजारातील मूल्य हे 1.25 ट्रिलियन डॉलर आणि एकुण क्रिप्टो मार्केट कॅपिटलायझेशन 2.38 ट्रिलियन डॉलर इतके झाले आहे.
असा उंचावला आलेख
- 2009 साली बिटकॉईनच्या सुरुवतीला 6 पैसे अशी किंमत
- 2010 मध्ये पहिली तेजी आली, त्यावेळी 0.08 डॉलरवर भाव
- एप्रिल 2011 मध्ये बिटकॉईन 1 डॉलरवर पोहचले
- नोव्हेंबर 2011 मध्ये आभासी चलन चढउतारानंतर 2 डॉलरवर
- ऑगस्ट 2012 मध्ये बिटकॉईन 13.20 डॉलरवर पोहचले
- 2013 ठरले निर्णायक, एप्रिल महिन्यात किंमत 220 डॉलरवर, नंतर घसरण
- 2015 मध्ये बिटकॉईनमध्ये चढउतार, किंमत 315 डॉलर
- 2017 मध्ये सर्वात मोठी उसळी, बिटकॉईन 1000 डॉलरच्या घरात
- जून 2019 मध्ये 10 हजारांचा उच्चांक, नंतर पुन्हा 7,112 डॉलरवर घसरण
- कोरोना काळात बिटकॉईन 18,353 डॉलरवर ट्रेड करत होते
- जानेवारी 2021 मध्ये आभासी चलनाने 40 हजारांचा टप्पा ओलांडला
- सध्या बिटकॉईन 72 हजार 800 डॉलरच्या घरात